ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीला म्हैस सांभाळणे चांगलेच महागात पडले आहे. म्हशीच्या शेणामुळे या व्यक्तीला ९ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. दरम्यान, हा दंड येथील ग्वाल्हेर नगरपालिकेने वसूल केला आहे. विशेष म्हणजे, याआधीही ग्वाल्हेर नगरपरिषदेने येथील म्हशी पाळणाऱ्या मालकांकडून दंड वसूल केला आहे.
ग्वाल्हेर नगरपरिषदेकेडून स्वच्छता सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. या मोहिमेनुसार अशी कारवाई करण्यात येत आहे. शहरात अनेक ठिकाणी पशुपालक आपली जनावरे रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी बांधतात. त्यामुळे नगरपरिषदेकडून सार्वजनिक ठिकाणी पशूंना बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गुरुवारी येथील सिरौल रस्त्याजवळ एक म्हैस दिसून आली. या म्हशीचे शेण देखील याठिकाणी होते. त्यामुळे ग्वाल्हेर नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हशीला ताब्यात घेतले. त्यानंतर म्हशीचा मालक नंदकिशोर यांच्याकडून दंड वसूल केला. अधिकाऱ्यांनी दंड वसूल केल्यानंतर नंदकिशोर यांना म्हैस परत करण्यात आली.
याआधीही ग्वाल्हेर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर घाण केल्याप्रकरणी काही पशू मालकांकडून दंड वसूल केला आहे. २०२० मध्ये म्हैस संभाळणाऱ्या एका व्यक्तीकडून नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १० हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. तसेच, शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे.