लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/वाराणसी: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण हाेईपर्यंत स्थानिक दिवाणी न्यायालयाने काेणताही आदेश देऊ नये, असे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, दिवाणी न्यायालयात विशेष आयुक्तांनी मशिदीच्या सर्वेक्षणाचा ८ पानी अहवाल सादर केला. त्यानंतर दिवाणी न्यायालयाने २३ मेपर्यंत सुनावणी स्थगित केली.
हिंदू पक्षकारांनी मुख्य अधिवक्ता अस्वस्थ असल्याने शपथपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला. त्यावर न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांना काही आक्षेप असल्याबाबत विचारणा केली. त्यांनी काेणताही आक्षेप घेतला नाही. मात्र, दिवाणी न्यायालयात भिंती ताेडण्याबाबत सुनावणी हाेणार असल्याकडे त्यांनी सर्वाेच्च न्यायालयाचे लक्ष वेधले. हा मुद्दा मान्य करून सर्वाेच्च न्यायालयाने सुनावणी शुक्रवारी २० मेपर्यंत स्थगित केली. तसेच वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाला काेणतेही आदेश न देण्याचे निर्देश दिले.
छायाचित्रे आणि व्हिडिओदेखील सादर
विशेष आयुक्त विशाल सिंह यांनी दिवाणी न्यायालयात ८ पानी सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यासाेबत काही छायाचित्रे व अनेक तासांचे व्हीडिओ चित्रीकरणही जाेडण्यात आले आहे. दाेन्ही पक्षकारांनी उत्तरे दाखल केली. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे सुनावणी २३ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली.