'ज्ञानवापी, मथुरा अन् ताजमहल..; यांच्या टार्गेटवर तीन हजार मशिदी', समाजवादी पार्टीची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 05:22 PM2024-02-08T17:22:26+5:302024-02-08T17:22:53+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर सपा नेत्याने निशाणा साधला.
लखनौ: अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारल्यानंतर आता वाराणसी आणि मथुरेचा मुद्दा जोर धरत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही बुधवारी विधानसभेत अयोध्येसह काशी आणि मथुरेचा उल्लेख केला. 'बहुसंख्य समाजाला आपल्या श्रद्धेसाठी भीक मागावी लागली. आता नंदी बाबा (काशी) म्हणतात- मी का थांबू,' असं योगी यावेळी म्हणाले.
आम्ही तीन जागा मागितल्या
सीएम योगी पुढे म्हणाले की, 'ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला पांडवांसाठी पाच गावे मागितली होती, त्याचप्रमाणे आम्ही फक्त अयोध्या, मथुरा आणि काशी, या तीन ठिकाणांबद्दल बोललो होतो. दुर्योधनाने सुईच्या टोकाएवढीही जागा दिली नाही, त्यामुळे महाभारत घडणारच होते. मतांसाठी आमची संस्कृती आणि श्रद्धा पायदळी तुडवणाऱ्या आक्रमकांचा गौरव करण्यात आला, ज्याला यापुढे देश स्वीकारणार नाही.'
सपाचा पटलवर
योगींच्या या विधानामुळे राजकीय वाद सुरू झाला आहे. यावर समाजवादी पार्टीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. सपा खासदार एसटी हसन म्हणाले की, बाबरी मशिदीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सोडवला होता. आता ज्ञानवापी, मथुरा, ताजमहाल, कुतुबमिनार सह देशभरातील तीन हजार मशिदींवर यांचे लक्ष आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, मतांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या गोष्टी देशाला कमकुवत करणार, हे या लोकांना कळत नाही का?असा सवाल त्यांनी यावेळी केला.