नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, सीपीएम नेते सीताराम येन्चुरी, आरजेडीचे मनोज झा, सीपीआयचे डी. राजा आणि एलजेडीचे शरद यादव यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, जामिया विश्वविद्यापीठातील युवकांना टॉयलेटमध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली. मुलींनाही मारहाण करण्यात आली. आमच्या काळातही विद्यार्थ्यांची आंदोलन होत होती. मात्र कॉलेज प्राध्यापकांच्या परवानगीशिवाय पोलीस विद्यापीठात प्रवेश करु शकत नव्हते. जर कुलगुरु आणि कॉलेज प्राचार्यांनी परवानगी दिली नाही तर दिल्ली पोलीस विद्यापीठात घुसले कसे? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
त्याचसोबत माझ्याकडे जे व्हिडीओ आलेत त्यामध्ये विद्यार्थींनी आम्हाला वाचवा-वाचवा असे ओरडत होते. त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील अन्य भागातही विद्यार्थी निदर्शने करतात. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कोलकाता, सूरत, वाराणसी, बिहार, औरंगाबाद, कानपूर, मुंबई याठिकाणीही प्रदर्शन होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. पंतप्रधान मोदी सांगतात हे सर्व काँग्रेस पक्ष करतोय, जर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता. या आंदोलनाला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसने केला.
यावेळी बोलताना सीताराम येन्चुरी यांनी सांगितले की, ही घटना हिंदू-मुस्लीम नाही तर लोकशाहीवरील हल्ला आहे. संविधानावर हल्ला आहे. पोलिसांना जामिया विश्वविद्यापीठात प्रवेश करण्याची परवानगी दिली कोणी? या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हायला हवी. जर सरकारने संसदेत घटनेविरोधात विधेयक आणलं नसतं तर अशाप्रकारची स्थिती उद्भवली नसती. भाजपा धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते त्याचा निषेध येन्चुरी यांनी केला.
रविवारी संध्याकाळी दिल्लीतील जामिया नगर येथे तीन बसेसला आग लावण्यात आली होती. त्यानंतर हा विवाद वाढला. ही आग जामिया विद्यापीठातील मुस्लीम विद्यार्थ्यांनी लावली असा आरोप करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा नकार केला. तर भाजपाच्या इशाऱ्यावर काही लोकांनी बसला आग लावली असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.