हाफिज सईद भारताविरोधात पुन्हा बरळला, म्हणाला 1971 चा सूड घेण्यासाठी काश्मीर हाच मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 09:58 PM2017-12-16T21:58:26+5:302017-12-16T21:58:47+5:30
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद पुन्हा एकदा भारताविरोधात बरळला आहे.
लाहोर- मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद पुन्हा एकदा भारताविरोधात बरळला आहे. मशरिकी पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) चा सूड घ्यायचा असेल तर काश्मीर हा त्यासाठीचा मार्ग आहे. सूड घेण्यासाठी काश्मीरमधून आपण वाट काढू, असं हाफिज सईदने म्हंटलं आहे. लाहोरमध्ये झालेल्या सभेत तो बोलत होता. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका यांनी हाफिज सईदला दहशतवादी घोषित केलं आहे. तर दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच नजरकैदेतून त्याची सुटका केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
Global terrorist Saeed issues warning to India
— ANI Digital (@ani_digital) December 16, 2017
Read @ANI | https://t.co/QDrGDvcvXgpic.twitter.com/yplpgRXAQi
अमेरिकेने हाफिज सईदवर 1 कोटी रूपयांचं बक्षीस ठेवलं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना शिक्षा देण्याबाबत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत गंभीर नाही, अशी प्रतिक्रिया भारताने हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर दिली होती. आता याच हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकत 1971 चा बदला घ्यायचा असल्याचं म्हटलं आहे.
आठवड्याभरापूर्वी पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यासोबत हाफिज सईद युती करणार असल्याचंही वृत्त होतं. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने 2018 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं होतं. तसंच जमात उद दावा या दहशतवादी संघटनेने ऑगस्ट महिन्यात मिल्ली मुस्लिम लीग या पक्षाचीही स्थापना केली आहे. हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्याची मागणी पाकिस्तान सरकारने केली होती. पण पुराव्यांअभावी त्याची नजरकैदेतून सुटका करण्यात आली.