नवी दिल्ली: शहरात पहिल्यांदाच केस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. टक्कल पडलेल्यांसाठी विग तयार करणाऱ्या उद्योजकाकडून 25 लाख किमतीचे केस शस्त्राच्या धाकानं लांबवण्यात आले आहेत. उद्योजकानं हे केस तिरुपती बालाजी आणि अन्य ठिकाणांवरुन खरेदी केले होते. या चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र पहिल्यांदाच समोर आलेल्या केसांच्या चोरीमुळे पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 25 लाख रुपये किमतीच्या केसांची चोरी झाल्याची घटना दिल्लीतील नांगलोई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचे केस ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय या दोघांकडे एक पिस्तुलदेखील सापडलं आहे. आरोपींच्या चार साथीदारांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. 'जहांगीर हुसैन त्यांचे भाऊ ताजुद्दीनसोबत नांगलोई भागात राहतात. ते तिरुपती मंदिरातून केस खरेदी करुन नांगलोईत आणतात. याठिकाणी विग तयार करण्याचं काम चालतं. 27 जुलैला त्यांनी चोरी झाल्याची माहिती आम्हाला दिली,' असं डीसीपी सेजू पी. कुरुविला यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करताना पाच सशस्त्र आरोपींनी ही चोरी केल्याचं समोर आलं. पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी दोन्ही भावांना धमकावलं आणि मारहाण केली. त्यांना एका खोलीत बंद करुन पाचजण 230 किलो केस, 30 हजार रुपये आणि दोन मोबाईल घेऊन पसार झाले. या घटनेच्या एक दिवस आधी पाचजणांपैकी एकजण विग पाहायला आला होता. आपल्याला विग आवडला असून उद्या खरेदीसाठी येतो, असं म्हणून तो आरोपी निघून गेला होता.
ही तर भलतीच 'केस'! शस्त्राच्या धाकानं 25 लाखांचे केस चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 10:39 AM