हॅप्पी मान्सून! देवभूमीत पावसाची जोरदार हजेरी; विलंबाने का होईना केरळमध्ये पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 01:56 PM2023-06-08T13:56:19+5:302023-06-08T13:56:31+5:30
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनच्या तीव्रतेवर परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आठवडाभर विलंबाने का होईना बळीराजा चातकाप्रमाणे वाट पाहत असलेला मान्सून अखेर केरळमध्ये पोहोचला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज प्रवेश केला. हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनच्या तीव्रतेवर परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग आणि मध्य अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप, केरळचा बहुतांश भाग आणि दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग, मन्नारची खाडी, नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकला आहे.
पुढील ४८ तासांत मान्सुनला पुढे सरकण्यासाठी अनुकुल स्थिती राहणार आहे. या मान्सूची वाट बिपरजॉय चक्रीवादळ रोखण्याची शक्यता आहे. कारण हे वादळ मान्सूनच्या पुढे सरकत आहे. अरबी समुद्रात २०२३ या वर्षातील पहिलेच मान्सूनपूर्व वादळ दिवसेंदिवस जोर धरत आहे. समुद्रात निर्माण झालेल्या खोल दबावाचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून ते वेगाने पुढे जात आहे. येत्या तीन दिवसांत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. ८ ते १० जून दरम्यान समुद्रात खूप उंच लाटा येण्याची शक्यता आयएमडीने आधीच वर्तवली आहे. १२ जूनपर्यंत ही प्रणाली अत्यंत तीव्र चक्रीवादळाची ताकद कायम ठेवण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम गुजरातच्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये दिसून येईल.
हवामान खात्याने किनारपट्टीवरील शहरांमध्ये प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासोबतच समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मान्सून १२ ते १६ जून या काळात दाखल होण्याची शक्यता आहे.