हापुड: उत्तर प्रदेशच्या हापुडमधील नानई गावचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हापुडमध्ये भाजप आमदार कमल मलिक यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. ग्रामस्थांनी आमदार महोदयांना गटाराच्या साचलेल्या पाण्यातून चालायला लावलं. आमदार झाल्यापासून मलिक गेल्या ४ वर्षांपासून नानई गावात आले नव्हते. आमदार झाल्यापासून ४ वर्षे गावात न फिरकलेले मलिक गावात येताच ग्रामस्थ भडकले. अनेकांनी मलिक यांना चांगलंच सुनावलं. ग्रामस्थ मलिक यांनी बोलावलेली सभा सोडून गेले. त्यामुळे आमदारांना गावातून परतावं लागलं.
आमदार कमल मलिक नानई गावात पोहोचताच लोकांनी त्यांना गराडा घातला. ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या मलिक यांच्या कानावर घातल्या. एका ग्रामस्थानं मलिक यांचा हात धरला आणि त्यांना पाणी साचलेल्या रस्त्यावरून चालत नेलं. 'गावात दरवर्षी पाणी साचतं. मात्र पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नाही. सरपंचांनी गावात रस्ता तयार केला. मात्र पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नाही. तुम्ही निवडून आल्यापासून एकदाही गावात फिरकला नाहीत,' अशी व्यथा मांडत एका ग्रामस्थानं मलिक यांना थेट पाणी साचलेल्या रस्त्यावरून चालवत नेलं. ही घटना तिथे उपस्थित असलेल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या प्रकरणी आमदार मलिक यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांशी तक्रार दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. 'ग्रामस्थांचा विकास आमचं उद्दिष्ट आहे. लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये,' असं मलिक म्हणाले. मलिक यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.