गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खटिया गावाबाहेर असलेल्या १६ हेक्टर परिसरातील शुष्क जमिनी खालील अनेक रहस्य दबलेली आहेत. येथे बांगड्या, मातीची भांडी, दगडी पाते, एवढंच नाही तर मानवी सांगाडाही सापडला आहे. २०१८ नंतर पुरातत्त्ववेत्त्यांच्या एका बहु अनुशासनात्मक आंतरराष्ट्रीय टीमने ५०० थडग्यांचा शोध लावला आहे. त्यामधील १९७ थडग्यांचं खोदकाम झालं आहे. त्यातून अनेक रहस्यांचा उलगडा झाला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार केरळ विद्यापीठात पुरातत्त्व विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक असलेल्या राजेश एस.व्ही यांच्या नेतृत्वाखाली शोध घेण्यात आला. त्यामध्ये ही दफनभूमी सापडली. ती ५ हजार वर्षे जुनी असावी, असा शोधकर्त्यांचा अंदाज आहे. हा भाग हडप्पा संस्कृतीच्या पूर्व शहरी चरणाशी संबंधित होता. ही दफनभूमी ही एका मोठ्या मानवी वस्तीसाठी तयार करण्यात आली होती. की ती छोट्या समुहासाठी केलेली एक सामान्य सुविधा होती, याचा शोध घेतला जात आहे.
हडप्पा संस्कृती जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे. ती सुमारे ५ हजार इसवी सनापूर्वीपासून ते इसवी सनापूर्वी १००० वर्षांपर्यंत सिंधू नदीच्या किनाऱ्यावर नांदत होती. आतापर्यंत येथील भागातून जे काही अवशेष मिळाले आहेत, ते पाहता ते पूर्व-शहरी हडप्पा काळाशी अनुरूप असे आहेत. खटिया येथी उत्खनन योजनेचे सहसंचालक आणि केरळ विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक अभयन जीएस यांनी सांगितले की, खटिया येथे सापडलेल्या साहित्यामधील मातीच्या भांड्यांची तुलना ही सिंध, बलुचिस्तान आणि उत्तर गुजरातमधील पूर्व शहरी हडप्पा मातीच्या भांड्यांशी केली जाऊ शकते.
त्यांनी सांगितले की, खटिया येथील माती आम्लयुक्त आहे. त्यामुळे मृतदेहांचं वेगाने विघटन होतं. त्यामुळे संशोधकांना या ठिकाणाहून खोदण्यात आलेल्या नमुन्यांमधून डीएनए शोधण्यात अडचणी येत आहेत. जोपर्यंत डीएनए सापडत नाही, तोपर्यंत खटिया येथील रहस्यं उलगडता येणार नाहीत. आता इथे दफन करण्यात आलेले लोक हे कुठून आले होते हा प्रश्न पडला आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.