अहमदबाद : अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी केला. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर पाटीदार समाजाचे नेता हार्दिक पटेल यांनी तोगडियांची भेट घेतली. तोगडियांची भेट घेतल्यानंतर हार्दिक पटेलनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी आणि शहा हे प्रवीण तोगडियांविरोधात कट रचत आहेत असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने यावेळी केला.'तोगडियांच्या विरोधात कट रचला जात आहे, हा कट दुसरं-तिसरं कुणी नाही तर खुद्द पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी रचला आहे. तोगडिया आणि आम्ही शेतक-यांच्या हिताचे मुद्दे उचलतो म्हणून आम्हाला लक्ष्य केलं जात आहे' असं पटेल यावेळी म्हणाले. 'विद्यमान भाजपा सरकार तोडगियांना त्रास देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावरून तोगडियांना मोदी-शहा त्रास देत आहेत , सर्वांना माहीत आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा या कटामागे हात आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ तोगडिया यांच्या विरोधात आहे, हे आता लपून राहिलेले नाही' असं हार्दिक पटेल पुढे म्हणाले. हार्दिक पटेल आणि तोगडिया यांची भेट यापूर्वीही अनेकदा झाली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दोघांच्या जुन्या भेटीचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. सोमवारी तोगडिया बेपत्ता झाल्याचं वृत्त आल्यानंतर हार्दिक पटेलने एखाहून एक ट्वीट करत भाजपा आमि मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. एका ट्विटमध्ये प्रश्न विचारताना हार्दिक म्हणाला, ''Z+ सुरक्षा असताना तोडडिया बेपत्ता कसे होतात, मग सामान्य माणसाचं काय. जीवाला धोका आहे असं तोगडिया पूर्वीच म्हणाले होते''. तर दुस-या ट्विटमध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये तोगडिया बेपत्ता झाले असते तर भाजपाने संपूर्ण देशात हिंसा घडवली असती, भक्तांना जे बोलायचं असेत ते बोलू शकतात, कारण या मुद्द्यावर नाही बोललात तर पगार नाही मिळणार असं खोचक ट्वीट त्याने केलं. गुजरातच्या शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. काल एक व्यक्ति माझ्या घरात घुसला व माझ एन्काऊंटर करण्याचं षडयंत्र असल्याचं मला सांगितलं. 10 वर्षांपूर्वीची जुनी प्रकरणे उकरुन काढून मला त्यामध्ये मला गोवण्याचा डाव आहे. आयबीच्या माध्यमातून मला धमकावण्याचा प्रयत्न होतोय असा गंभीर आरोप प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे.
तोगाडियांनी कुठल्याही राजकीय नेत्याचे नाव घेतले नसले तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मागच्या काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मी हिंदू एकतेसाठी प्रयत्न करत आहे आणि करत राहीन. मी मरणाला अजिबात घाबरत नाही असे प्रवीण तोगाडिया म्हणाले. या पत्रकार परिषदेदरम्यान भावून झालेल्या तोगाडिया यांना रडू कोसळले.
डॉक्टर असलेले प्रवीण तोगाडिया 1984 पासून संघाऐवजी विश्व हिंदू परिषदेत कामाला सुरुवात केली. प्रवीण तोगाडिया काल बेपत्ता झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर रात्री ते शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडले. अहमदाबादमधील चंद्रमणी रुग्णालयात प्रवीण तोगडिया त्यांचावर उपचार सुरु आहेत. मला राजस्थान पोलीस अटक करायला आल्याचे सांगण्याच आले होते पण राजस्थानच्या गृहमंत्र्यांशी मी बोललो त्यावेळी त्यांनी माझ्या नावे कुठलेही अटक वॉरंट नसल्याचे सांगितले. मी लगेच माझा फोन स्विचऑफ केला असे तोगाडिया म्हणाले. पोलिसांनी राजकीय दबावाखाली काम करु नये असे त्यांनी सांगितले. राम मंदिर, गोरक्षेसाठी एकटयाने लढावं लागलं तरी मी लढत राहीन असे तोगाडिया म्हणाले.
काल सकाळपासून प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी चार पथके कामाला लावली होती. सोमवारी संध्याकाळपर्यंत तोगडिया यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. मात्र, रात्रीच्या सुमारास ते अहमदाबादमधील शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजस्थान पोलीस प्रवीण तोगडिया यांना पकडून घेऊन गेले, असे विहिंपने म्हटले होते. मात्र सह पोलीस आयुक्त (गुन्हे) जे. के. भट्ट यांनी त्याचा इन्कार केला. आम्ही किंवा राजस्थान पोलिसांनी तोगडिया यांना पकडलेले नाही. ते ‘बेपत्ता’ आहेत व त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके स्थापन केली आहेत, असे त्यांनी सांगितले होते. भट्ट म्हणाले की, राजस्थानमधील एका खटल्यातील अटक वॉरन्ट घेऊन तेथील पोलीस आले होते. आमचे पोलीस त्यांच्यासोबत तोगडिया यांच्या घरी व विहिंपच्या कार्यालयात गेले. पण दोन्ही ठिकाणी ते सापडले नाहीत.सह पोलीस आयुक्तांनी असेही सांगितले की, तोगडिया यांना ‘झेड’ सुरक्षा आहे. परंतु सोमवारी सकाळी ते सुरक्षा रक्षक सोबत न घेताच एका दाढीवाल्या माणसासोबत विहिंप कार्यालयातून बाहेर पडले व रिक्षेत बसून गेले अशी माहिती मिळाली. पण ते नेमके कुठे गेले किंवा कुठे आहेत याची माहिती नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असून आम्ही विहिंपवाल्यांशी सतत संपर्कात आहोत.