नवी दिल्ली - अत्यंत अटीतटीची झालेली गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची झुंज झाली. या दरम्यान दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाली. त्यातून वादविवादही झाले. नजर टाकूया गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या मोठ्या विवादांवर. हार्दिक पटेलच्या सेक्स सीडीपाटीदार अनामत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रान उठवले होते. त्यानंतर विरोधकांनी हार्दिक पटेल याच्या एकापाठोपाठ एक सेक्स सीडी लीक करून त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मोठा वाद झाला. काँग्रेसच्या युथ विंगकडून मोंदींवर निशाणा काँग्रेसच्या यूथ विंगने ट्विटरवर मोदींचा चहावाला असा उल्लेख केला. त्यावरून काँग्रेसच्या युथ विंगला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर काँग्रेसने माफी मागून हे मीम डिलीट केले. त्यानंतर मोदींनी हा मुद्दा उठवून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. मी चहा विकला आहे देश नाही, अशी टीका त्यांनी सभेमधून केली. मणिशंकर अय्यर यांची नीच टिप्पणी
गुजरात निवडणुकीत भाजपा अडचणीत असताना मणिशंकर अय्यर यांचे एक वक्तव्य भाजपासाठी बुस्टर डोस देणारे ठरले. प्रसारमाध्यमांशी बोलताना मणिशंकर अय्यर यांनी मोदींचा उल्लेख "नीच किस्म का आदमी" असा केला. या वक्तव्यावरून पेटलेल्या वादात मोदींनी काँग्रेसला चौफेर घेरले. त्यानंतर राहुल गांधींनी तातडीने कारवाई करत मणिशंकर अय्यर यांना पक्षातून हटवले. मात्र तोपर्यंत काँग्रेसचे नुकसान झाले होते.
राहुल गांधींचा धर्म आणि जानवं गुजरातमध्ये आपली हिंदुविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी राहुल गांधीनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. मात्र सोमनाथ मंदिर भेटीदरम्यान गैर हिंदूंसाठी असलेल्या रजिस्टरमध्ये राहुल गांधींचे नाव आल्याने भाजपाने राहुल गांधींना घेरले. त्यानंतर काँग्रेसने भाजपावर पलटवार करताना राहुल गांधी हे जानवेधारी हिंदू असल्याचे सांगितले. भाजपाकडून एक कोटींची ऑफरपाटीदार नेते नरेंद्र पटेल यांनी प्रचारादरम्यान भाजपावर गंभीर आरोप केला. भाजपाने आपल्याशी हातमिळवणी करण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजपाने हे आरोप फेटाळले.
मोंदींचे सी-प्लेनमधून उड्डाण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील विकास अधोरेखित करण्यासाठी सी-प्लेनमधून प्रवास केला. मात्र सुरक्षेची खबरदारी न घेतल्याने मोदींवर टीका झाली.
मोदींच्या आहारातील लाखमोलाचे मशरूम काँग्रेसचे नेते अल्पेश ठाकोर यांनी मोदी हे 80 हजार किमतीचे मशरूम खातात असा आरोप केला. हे मशरूम तैवानवरून येतात असा आरोप त्यांनी केला होता. मात्र या आरोपांमुळे अल्पेश ठाकोर यांचे हसे झाले.