नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात जाणार? दिग्गज नेत्याने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:33 AM2021-09-30T07:33:25+5:302021-09-30T07:40:19+5:30

एकीकडे पंजाबमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असून, दुसरीकडे मात्र वेगवान राजकीय घडामोडींमुळे अवघ्या देशाचे लक्ष आता पंजाबकडे लागले आहे.

harpal singh cheema says navjot singh sidhu will not be part of aam aadmi party | नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात जाणार? दिग्गज नेत्याने केला मोठा खुलासा

नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात जाणार? दिग्गज नेत्याने केला मोठा खुलासा

Next
ठळक मुद्देनवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात जाणार?आम आदमी पक्षाचे बडे नेते हरपाल सिंग चीमा यांनी स्पष्ट सांगितलेकेवळ सिद्धूच नाही, तर काँग्रेस नेते जनतेसमोर जायला घाबरतात

चंदीगड: एकीकडे पंजाबमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असून, दुसरीकडे मात्र वेगवान राजकीय घडामोडींमुळे अवघ्या देशाचे लक्ष आता पंजाबकडे लागले आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये अनेक मोठी राजकीय उलथापलथ होत असून, पक्षातील अंतर्गत वाद सातत्याने चव्हाट्यावर येताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यातच आम आदमी पक्षाच्या एका दिग्गज नेत्याने केलेल्या सूचक विधान केले आहे. (harpal singh cheema says navjot singh sidhu will not be part of aam aadmi party)

एकीकडे निवडणुका उंबरठ्यावर असताना दुसरीकडे काँग्रेसमधील कलह पक्षासाठी चिंता वाढवणार ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचा देशातील प्रभावही कमी होताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच अशा घटनांची भर पडल्याने काँग्रेससमोरील आव्हाने वाढताना दिसत असल्याची चर्चा देशभरात सुरू झाली आहे. आम आदमी पक्षाचे बडे नेते हरपाल सिंग चीमा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देत आम आदमी पक्षातील प्रवेशाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

पंजाबमध्ये सामान्य माणूस मुख्य चेहरा असेल

आगामी निवडणुकांमध्ये एखादा सामान्य माणूस आम आदमी पक्षाचा चेहरा असेल. नवज्योत सिंग सिद्धू यांनी खुर्चीसाठी पंजाबमधील नागरिकांची फसवणूक केली आहे. ते कधीही आम आदमी पक्षात सामील होणार नाहीत. सिद्धू गेली साडेचार वर्षे काँग्रेस पक्षात आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर आता ते बिथरले आहेत, घाबरले आहेत, अशी टीका चीमा यांनी केली. जनतेला दिलेला शब्द त्यांना पाळता आला नाही. म्हणूनच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. केवळ सिद्धूच नाही, तर काँग्रेसचे सर्व नेते जनतेसमोर जायला घाबरतात. आता जनतेलाही काँग्रेसचा खरा चेहरा समजला आहे. जनतेने फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहावे, असे आवाहन यावेळी चीमा यांनी केले. 

कॅप्टन अमरिंदर सिंग आणि अमित शहांमध्ये चर्चा

नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे न घेतल्याने नवा अध्यक्ष नेमावा का, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असतानाच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कॅप्टन व शाह यांच्यात पाऊण तास चर्चा झाली. कॅप्टननी त्याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला. ते भाजपमध्ये जाणार, की काँग्रेसमध्ये राहूनच भाजपला मदत करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये राजकीय गोंधळ सुरू असतानाच नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यात, आपण शेवटच्या श्वासापर्यंत हक्क आणि सत्याची लढाई लढत राहणार. तसेच नैतिकतेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. एवढेच नाही, तर भ्रष्ट मंत्र्यांना पुन्हा आणण्याचा निर्णय आपण कधीही स्वीकारणार नाही, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.
 

Web Title: harpal singh cheema says navjot singh sidhu will not be part of aam aadmi party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.