नवी दिल्ली - दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून गेल्या काही दिवसांपासून त्याचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली मात्र यावेळी काही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. मात्र याच दरम्यान अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रातील माजी मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या खिळे असलेल्या सुरक्षेवर टीकास्त्र सोडलं आहे. शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जातेय, ती लाजिरवाणी गोष्ट आहे असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं आहे.
"शेतकरी आंदोलनस्थळाला ज्या पद्धतीनं बालेकिल्ल्याचं स्वरुप दिलं गेलंय, ते पाहून मला या सरकारचं केवळ आश्चर्य वाटतं आहे. रत्यावर बॅरिकेडस उभारण्यात आले आहेत, खिळे ठोकले गेलेत इतकंच नाही तर पोलिसांना लोखंडी हत्यारं देण्यात आली आहेत जणू काही सीमेवर पाकिस्तानी उभे आहेत. ही तुमचीच जनता आहे. तुमचेच शेतकरी आहेत, ज्यांना तुम्ही अशा पद्धतीनं वागवत आहात" अशी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी आपण फक्त एक फोन कॉल दूर आहोत असं म्हटलं होतं. त्यावरून हरसिमरत यांनी टोला लगावला आहे.
"शेतकरी दारात येऊन उभे आहेत आणि पंतप्रधान अजूनही एका फोन कॉलवर आहेत, हे दुर्दैवी आहे" असं हरसिमरत कौर बादल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंजाबमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. फजिल्काच्या जलालाबादमध्ये मंगळवारी स्थानिक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या दोन पक्षांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कारवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तीन कार्यकर्त्यांना गोळी लागल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस-अकाली दलाचे कार्यकर्ते भिडले, सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला
अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर अकाली दल आणि काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले. याच दरम्यान एकमेकांवर दगडफेकही केली. तसेच गोळीबार देखील करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रावर जात असताना ही घटना घडली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. एकमेकांवर लाठ्याकाठ्या आणि गोळीबारही करण्यात आला. तसेच दगडफेकही करण्यात आली. फिरोजपूरच्या गुरुहरसहायमध्ये या आधी दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली होती.
लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील आरोपी असणाऱ्या दीप सिद्धूच्या अटकेसाठी एक लाखाचं बक्षीस
थेट लाल किल्ल्यात घुसून शेतकऱ्यांनी धर्मध्वज फडकवला, शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप ज्या दीप सिद्धूवर ठेवण्यात आला असून तो अद्याप फरार आहे. दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण देखील फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी आता बक्षीस जाहीर केलं आहेत. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचं रोख बक्षीस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 50,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. दीप सिद्धूसह जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांच्या अटकेसाठी त्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाख रुपयाचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या जाजबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इकबाल सिंघ यांच्या अटकेसाठी प्रत्येकी 50,000 रुपये रोख रक्कमेची घोषणा करण्यात आली.