नवी दिल्ली - देशभरात सध्या नागरिकता संशोधन कायद्यामुळे गदारोळ सुरू आहे. अनेकांना आपली नागरिकता गमावण्याची भीती वाटत आहे. भाजपकडून या कायद्याचे मोठ्या प्रमाणात समर्थन करण्यात येत आहे. मात्र भाजपचे नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडेच नागरिकत्वाचे दस्तऐवज नसल्याचे समोर आले आहे.
माहिती अधिकारात मागवण्यात आलेल्या माहितीत, मुख्यमंत्री खट्टर आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांसह राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे देखील नागरिकत्वाचे दस्तऐवज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पानिपतचे माहिती अधिकार कार्यकर्ते पी.पी. कपूर यांनी 20 जानेवारी रोजी या संदर्भात माहिती मागवली होती. यावर मिळालेल्या माहितीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
माहिती अधिकारी पूनम राठी यांनी दिलेल्या माहितीत म्हटले की, त्यांच्याकडे या संदर्भातील काहीही माहिती उपलब्ध नाही. मात्र मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे नागरिकत्वाचे दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे असू शकतात, असं त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी निवडणुकीच्या काळात खट्टर यांनी विधानसभेत वचन दिले होते की, अवैधरित्या राहात असलेल्या नागरिकांना हरियाणातून हाकलून देण्यात येईल. त्यासाठी एनआरसी लागू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र आता त्यांच्याच नागरिकत्वाचे दस्तऐवज मिळाले नाहीत.