हरियाणा छेडछाड प्रकरण - भाजपा नेत्याचा सुपुत्र विकास बराला पुन्हा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 03:21 PM2017-08-09T15:21:11+5:302017-08-09T16:37:49+5:30
आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली भाजपा नेता सुभाष बराला यांचे सुपुत्र विकास बराला पोलिसांसमोर हजर झाला आहे
नवी दिल्ली, दि. 9 - आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली भाजपा नेता सुभाष बराला यांचे सुपुत्र विकास बराला याला अटक करण्यात आली आहे. विकास बराला याच्यासोबत त्याचा मित्र आशिष यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी विकासला पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दुपारी अडीच वाजता विकास बराला पोलीस ठाण्यात पोहोचला होता. चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. विकास बरालाविरोधात अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचं सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून, सीसीटीव्हीत विकास बराला वर्णिकाचा पाठलाग करताना स्पष्ट दिसत आहे.
#ChandigarhStalkingCase: Accused Vikas Barala, son of Haryana BJP chief Subhash Barala, arrives at police station in Sector 26, Chandigarh.
— ANI (@ANI) August 9, 2017
याआधीही पोलिसांनी विकास बराला आणि त्याच्या मित्राला अटक केली होती. मात्र त्यांच्यावर गुन्हा नोंद केला नसल्याने न्यायालयात हजर न करताच जामीन मंजूर करण्यात आला होता. पोलिसांनी जाणुनबुजून विकास बरालावर अजामीनपात्र गुन्हा नोंद केला नाही असा आरोप होत होता. अखेर पोलिसांनी आयपीसी 365 आणि 511 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
याआधी विकासचे वडिल आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सुभाष बरला यांनी यासंबंधी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला मुलगा विकास पोलिसांना तपासात संपुर्ण सहकार्य करेल, तसंच दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. पत्रकार परिषद सुरु असतानाच मुलगा विकासचा फोन आल्याने सुभाष बराला पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेले.
पत्रकार परिषदेदरम्यान सुभाष बराला यांनी सांगितलं की, 'आम्ही याप्रकरणी कोणतंही राजकारण केलं नसून, कोणताही दबाव टाकलेला नाही. जे आरोप लावण्यात येतील त्यानुसार कारवाई होईल. वर्णिका मुंडू माझ्या मुलीसारखी आहे. जर माझा मुलगा दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पोलिसांकडून कोणताही निष्काळजीपणा केला जात नसून योग्य कारवाई केली जात आहे'.
काय आहे प्रकरण -
हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याच्यावर एका मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्षांचा मुलगा कायद्याचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी आयएएस अधिका-याची मुलगी आहे. शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून चालली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. हरिणाया भाजपाध्यक्ष सुभाष बराला यांनी दिल्लीतल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं.