नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का, असा सवाल केला आहे. सिद्धरामय्या यांनी कन्नडमधून ट्विट केले आहे. त्यांचे ट्विट गुगल ट्रान्सलेट केल्यावर त्यांनी काय म्हटले आहे ते समजते. फक्त भाजपाचे नेते हिंदू आहेत का? आम्ही हिंदू नाही का? भाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का? माझे नाव सिद्धरामय्या आहे. सिद्धू आणि रामा माझ्या नावात आहे. आपण सगळे हिंदू आहोत. मात्र, आपल्याला सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. आपण सर्व एकसारखे दिसतो, याचा सन्मान केला पाहिजे. हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. हाच खरा हिंदुत्व आहे, असे सिद्धरमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री हनुमानाऐवजी टिपू सुलतानची पूजा करण्यात धन्यता मानतात असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर टीकेची झोड उठवली होती. यावर बोलताना सिद्धरामय्या यांनी अशाप्रकारे ट्विटरच्यामाध्यमातून प्रतिक्रिया दिली. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवर हुबळीमध्ये आयोजित एका रॅलीमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. त्यावेळी त्यांनी कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असून, त्यांच्या हत्याही होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे कर्नाटकमध्ये अराजकता माजली असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांच्यावर केला. तसेच, ते म्हणाले कर्नाटक ही हनुमानाची भूमी मानली जाते. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री हनुमानाऐवजी टिपू सुलतानची पूजा करण्यात धन्यता मानतात असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. दरम्यान , ही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये टिपू सुलतानाची जयंती साजरी केल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
भाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का? कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 5:29 PM
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का, असा सवाल केला आहे.
ठळक मुद्देभाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का?माझे नाव सिद्धरामय्या आहे. सिद्धू आणि रामा माझ्या नावात आहे. हनुमानाऐवजी टिपू सुलतानची पूजा करण्यात धन्यता मानतात