अहमदाबाद - भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. RSS च्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का, असा प्रश्न राहुल यांनी विचारला आहे. सध्या राहूल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर असून ते भाजपाच्या विरोधात जोरदार हल्ला चढवत आहेत. भाजपाचा मुख्य आधार आरएसएस आहे, या संघटनेत किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कधी बघितलंय का कुणी महिलांना या शाखांमध्ये अर्ध्या चड्डीत, मी तर नाही बघितलं कधी, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
अकोटा, गुजरात येथे झालेल्या एका कार्यक्रमात गांधी यांनी ही वक्तव्ये केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. गुजरातमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून राहूल गांधींनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात आतापासून प्रचाराचा धुराळा उडवला आहे. भाजपा तसेच संघावर ते जोरदार हल्ला चढवत असून आता भाजपा व संघामध्ये पुरूषी मनोवृत्तीचं राज्य चालतं व महिलांना तिथं स्थान नाही असा हल्ला ते चढवत आहेत. जोपर्यंत महिला गप्प बसतात, तोंड उघडत नाहीत, तोपर्यंत ठिक असतं, परंतु महिलांनी तोंड उघडलं की त्यांना गप्प करायचं अशी भाजपाची व संघाची नीती असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
अर्थात, भाजपानं 2014 मध्ये केलेल्या पराभवामुळे आपले डोळे उघडले असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचा महागाई कमी करण्याचा फॉर्मुला सांगितला राहुल गांधींनी
यावेळी एका महिलेने राहुल गांधी यांना महागाईच्या समस्येवर तुम्ही कसा तोडगा काढणार? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर महागाई कशी कमी करणार याचा फॉर्म्युला सांगितला. पेट्रोल, डिझेलचे दर हा महागाईचा पाया आहे. आपल्या वापरातील प्रत्येक गोष्टीच्या किंमतीवर पेट्रोल व डिझेलच्या दराचा परिणाम होतो. काही वर्षांपूर्वी 140 डॉलर प्रति बॅरल असलेली पेट्रोलचे दर आता 50 डॉलर प्रति बॅरलपर्यंत उतरले आहेत. मात्र, त्याचा फायदा देशातील जनतेला मिळत नाही. तो कुणाला मिळतोय माहीत नाही. मला माहीत आहे पण मी नाव घेणार नाही,' असे सांगतानाच 'पेट्रोलला जीएसटीमध्ये आणल्यास किंमती उतरतील,' असेही ते म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, 5 ते 10वर्ष पुढचा विचार करणं हे एखाद्या नेत्याचं काम असतं. मात्र येथे सक्तीने धोरणांची अंमलबजावणी करुन जनतेच्या डोळ्यात पाणी आणलं जात आहे. रोजगाराच्या बाबतीत भाजपापेक्षा काँग्रेस सरकारची कामगिरी चांगली होती, असा दावाही यावेळी राहुल गांधींनी केला.