सोनीपत : मोबाइल बाळगल्याने, जीन्स घातल्याने मुली मुलांसोबत पळून जातात. त्यामुळे गावातील एकाही तरुणीला जीन्स परिधान करता येणार नाही व मोबाइलही बाळगता येणार नाही असा फतवा हरयाणातील एका गाव पंचायतीने काढला आहे. सोनीपत जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. याला गावकऱ्यांचाही पाठिंबा असल्याचे सांगत सरपंचानेही उघड समर्थन केले आहे.खाप पंचायतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असली तरी ईशापूर या गावातील पंचायतीने मात्र हा बंदीचा फतवा काढला आहे. गावातील तीन मुलींनी प्रियकरांसमवेत पळून गेल्या असून, त्यांनी नंतर विवाहही केल्याने हा फतवा काढल्याचे सरपंचाने सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार, या तिन्ही मुली नेहमी जीन्स परिधान करीत आणि त्यांच्याकडे मोबाइलही होता, असे सरपंच प्रेम सिंग यांचे म्हणणे आहे. या मुलींकडे मोबाइल नसता, तर त्या पळून गेल्या नसत्या, असा अजब दावाही त्यांनी केला. गावाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आपणास व पंचायतीला आहेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या तिन्ही प्रकरणांमुळे आमच्या गावाची व पंचायतीची बदनामी झाली. त्यामुळे आम्ही सर्व पंचांनी मिळून हा निर्णय घेतला आणि गावकºयांनी त्याला मान्यता दिली, असा दावाही प्रेम सिंह यांनी केला. (वृत्तसंस्था)अधिकार नसूनही निघतात फतवेखाप पंचायतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यांच्या बैठका व आदेश यावरही लक्ष ठेवण्यास पोलिसांना बजावले आहे. तरीही हरयाणातील एका गावात त्याचे उल्लंघन झाले आहे. यापूर्वीही हरयाणा व उत्तर प्रदेशात काही गावांनी मुलींबाबत असे फतवे काढले आहेत. असे फतवे व पंचायतींच्या बैठका याकडे पोलीस व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
मोबाइल बाळगल्याने, जीन्स घातल्याने मुली मुलांसोबत पळून जातात; म्हणून या गावात बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:05 AM