बंगळुरु, दि. 23 - तो आला, त्याने पाहिलं आणि चोरी केली....नेमकं असचं काहीसं बंगळुरुत घडलं आहे. वाढदिवसाच्या पार्टीत पाहुणे म्हणून सहभागी झालेल्यांनीच चोर बनून घरात चोरी केल्याची घटना घडली आहे. सट्टा खेळताना आपण गमावलेले पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याची उघड झालं आहे. चोरांनी चाकूचा धाक दाखवत घरातून 28 हजारांची रोकड, तीन मोबाईल फोन आणि 63 ग्राम वजनाची सोन्याची चेन चोरी केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, मात्र अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. रविवारी रात्री ही चोरी झाली.
हे चोर म्हणजे दुसरे कोणी नाही तर थोड्या वेळापुर्वी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेले पाहुणे होते. संध्याकाळी ही वाढदिवसाची पार्टी पार पडली होती. पार्टीदरम्यान लावण्यात आलेल्या सट्ट्यात पैसे हारल्यामुळे ते पैसे परत मिळवण्यासाठी ही चोरी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय मुरलीधर यांनी आपला मित्र हरिशसाठी हनुमंतनगर परिसरात वाढदिवासाची पार्टी ठेवली होती. यावेळी पाहुण्यांनी सट्टा खेळला. चोरीमध्ये सामील असणारा मास्टरमाइंडही या खेळात सहभागी झाला होता. मात्र पैसे हारल्यामुळे तो तेथून निघून गेला होता. रात्री 10.30 वाजता आपल्या काही मित्रांसोबत तो घरात घुसला. त्यावेळी पीडित डिनर करत होते. चोरांनी चाकूचा धाक दाखवत चोरी करुन फरार झाले. मात्र यावेळी कोणालाही कसली इजा त्यांनी केली नाही.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. चोरांना पकडण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. शेजा-यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. घरातून 28 हजारांची रोकड, तीन मोबाईल फोन आणि 63 ग्राम वजनाची सोन्याची चेन चोरी झाल्याची माहिती पीडितांनी दिली आहे.
पोलिसांनी तपास सुरु केला असून चोरांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी रिक्षा आणि बाईकचा वापर केल्याचं उघड झालं आहे. एका व्यक्तीने आपण चोरांना रिक्षातून येताना पाहिल्याची साक्ष दिली आहे. मात्र रस्त्यावर लाईट नसल्याने आपण रिक्षाचा नंबर पाहू शकलो नाही अशी माहिती पोलिसांना दिली आहे.