वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख उत्तर दिले; पंतप्रधानांचा चीनला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:08 AM2020-06-29T03:08:14+5:302020-06-29T03:08:32+5:30
‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मातृभूमीच्या रक्षणासाठी लडाखमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला संपूर्ण देश नमन करत आहे,
नवी दिल्ली: भारत जशी मित्रता जपणे जाणतो तसेच डोळ््याला डोळे भिडवून जशास तसे उत्तरही देऊ शकतो. लडाखमध्ये भारतीय भूमीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना कणखरपणे प्रत्युत्तर दिले गेले आहे. भारतमातेच्या प्रतिष्ठेस कधीही कमीपणा येऊ दिला जाणार नाही, हे आपल्या शूर सैनिकांनी जगाला दाखवून दिले आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर कुरापती करणाºया चीनला रविवारी थेट टोला लगावला.
‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मातृभूमीच्या रक्षणासाठी लडाखमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शौर्याला संपूर्ण देश नमन करत आहे, त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. संपूर्ण देश या वीर जवानांचा कृतज्ञ आहे, त्यांच्यापुढे नतमस्तक आहे. या जवानांच्या हौतात्म्याने त्यांच्या कुटुंबियांप्राणेच प्रत्येक भारतीय हळहळला आहे. भारतमातेच्या या वीर सुपुत्रांच्या बलिदानाविषयी त्यांच्या कुटुंबियांना जो गर्व आहे, देशाप्रती जी निष्ठा आहे तीच देशाची खरी ताकद आहे.
पंतप्रधान म्हणाले की, या शहीद जवानांचे माता-पिता त्यांच्या दुसऱ्या मुलांनाही सैन्यात पाठवायला तयार आहेत. काहींनी तर नातवंडांनाही देशाच्या रक्षणासाठी धाडण्याचे बोलून दाखविले आहे. या शहीद कुटुंबांचा त्याग पूजनीय आहे. भारतमातेच्या रक्षणाच्या ज्या दृझनिश्चयाने या जवानांनी बलिदान दिले आहे, तोच संकल्प प्रत्येक नागरिकाने त्याच्या जीवनाचे ध्येय बनविण्याची गरजआहे. हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल.
स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण हा भारताचा संकल्प आहे. स्वावलंबन हे भारताचे लक्ष्य आहे, विश्वास आणि मैत्री ही भारताची परंपरा आहे व बंधुभाव हाच भारताचा स्थायीभाव आहे. हेच आदर्श समोर ठेवून भारत भविष्यातही वाटचाल करत राहील, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
इको फ्रेन्डली गणपती
पाऊस धरतीला पुनरुज्जीवन देतो. पण त्यासाठी आपणही पर्यावरण जपायला हवे, यावर भर देत पंतप्रधानांनी आगामी गणेशोत्सवात जलस्त्रोतांचे प्रदूषण होणार नाही, अशा फक्त ‘इको फ्रेन्डली’ गणेशमूर्तींचे पूजन करण्याचे आवाहन केले. तसेच एरवीही पावसाळ््यात अनेक प्रकारच्या साथा पसरत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची अधिक काळजी घेण्याचाही त्यांनी आग्रह धरला.
वर्षाचे सुरुवातीचे सहा महिने वाईट गेले म्हणून यंदाचे संपूर्ण वर्षच देशासाठी वाईट आहे, असे मानण्याचे कारण नाही. उलट सन २०२० हे वर्ष या दशकात देशाला नवी दिशा देणारे ठरेल. भारताचा इतिहासच अनेक संकटांवर मात करून अधिक बलशाली होऊन त्यातून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्षे संकटे आली तेव्हा भारत यातून सावरणार नाही, ही संस्कृती नष्ट होईल, असे अनेकांना वाटले. पण अशा प्रत्येक वेळी भारत अधिक भव्य स्वरूपात बाहेर पडला आहे.