'हे' खरंच देव आहेत, रुग्णाला खांद्यावर घेऊन 5 Km ची पायपीट करणारा 'डॉक्टर'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 10:05 AM2019-09-19T10:05:44+5:302019-09-19T10:07:48+5:30
आपल्या संस्कृतीत डॉक्टरला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक हिंदी-मराठी चत्रपटातील डायलॉगमध्येही आपल्याला याचा अनुभव आला आहे.
भुवनेश्वार - वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव संपुष्टात आला असून येथे फक्त बाजार उरलाय, अशी टीका नेहमीच वैद्यकीय क्षेत्राबद्दल करण्यात येते. रुग्णालयांची मल्टीस्पेशालिटी, तेथील डॉक्टरांची फी, महागड्या मेडिसीन यांमुळे दवाखाना म्हटलं की गरिबांना धास्ती वाटते. ग्रामीण भागात काही डॉक्टर आणि रुग्णालय यास अपवादही आहेत. ओडिशातील एका डॉक्टरच्या कृत्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरमध्ये देव पाहायला मिळाला. गावातील रुग्णासाठी अॅम्ब्युल्स उपलब्ध न झाल्याने चक्क डॉक्टरानेच रुग्णाला आपल्या खांद्यावर घेऊन रुग्णालयात पोहोचवले.
आपल्या संस्कृतीत डॉक्टरला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक हिंदी-मराठी चत्रपटातील डायलॉगमध्येही आपल्याला याचा अनुभव आला आहे. एकीकडे रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर लवकर दवाखान्यात येत नाहीत, अशी तक्रार सरकारी रुग्णालयांबाबत केली जाते. मात्र, दुसरीडे ओडिशाच्या मलकागिरी जिल्ह्यातील एका डॉक्टरने वैद्यकीय क्षेत्र हे सेवाक्षेत्र असल्याचं दाखवून दिलंय. आपल्या कृतीतून या डॉक्टरने डॉक्टर हा देवापेक्षा कमी नाही, असंच त्यांनी सांगितलंय. मलकागिरी येथील आयुर्वैदीक डॉक्टर शक्ती प्रसाद मिश्रा यांनी अॅम्ब्युल्सनच्या ड्रायव्हरच्या मदतीने एका रुग्णाला चक्क आपल्या खाद्यांवरुन रुग्णालयात नेले. त्यासाठी तब्बल 5 किलो मीटरची पायपीटही दोघांनी केली. डॉक्टर मिश्रा यांच्या या कार्याची थेट ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. तसेच, आपल्या कर्तव्यापलिकडे जाऊन मानवता जपणाऱ्या आणि रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या या डॉक्टरांच कार्य कौतुकास्पद असल्याचं ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी म्हटलंय. पटनाईक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉक्टर शक्तीप्रसाद मिश्रा यांचा फोटो शेअर केला आहे. तसेच, या डॉक्टरांची आपल्या कर्तव्याबद्दलची बांधिलकी पाहून अभिमान वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही पटनाईक यांची ही पोस्ट लाईक करत कौतुक केलं आहे.
Heartening to see the exemplary commitment of Ayush doctor Shakti Prasad Mishra of Malkangiri district who carried a sick boy on his shoulder through difficult terrain to shift him to hospital. Appreciate his act of humanity, beyond the call of duty, to save a patient’s life pic.twitter.com/nEJXAC0J55
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) September 18, 2019
डॉक्टर मिश्रा यांनी रस्ता नसलेल्या पायवाटीच्या झाडा-झुडपातून वाट काढत, 5 किमीची पायपीट करत आजारी असलेल्या मुलास रुग्णालयात पोहोचवले. डॉक्टर मिश्रा हे आयुर्वैदीक डॉक्टर असून मलकागिरी येथील खौरापुट ब्लॉकमधील एका मोबाईल हेल्थ सेंटरमध्ये कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्वास्थ मिशनअंतर्गत हे मोबाईल हेल्थ सेंटर कार्य करते. मंगळवारी डॉक्टर मिश्रा यांना बडादुरल पंचायतीमधील एका तरुण आजारी असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे हा युवक अनाथ असून त्याच्या देखभालीसाठी कुणीही नव्हते. त्यामुळे अॅम्ब्युल्स घेऊन डॉक्टर मिश्रा त्या युवकाच्या गावी निघाले. मात्र, गावाकडे जाण्यास डांबरी रस्ता नसल्याने त्यांना गावापासून 5 किमी दूरवरच अॅम्ब्युलन्सला उभे करावे लागले. त्यानंतर, डॉक्टरांनी गावात जाऊन त्या अनाथ मुलाला अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरच्या मदतीने 5 किमी पायपीट करुन रुग्णालयात पोहोचवले. डॉक्टरांच्या या तत्पर सेवाभावामुळे त्या आजारी तरुणाचा जीव वाचला. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू झाले.