नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (यूपीएससी २०१९) निकाल घोषित करण्यात आला असून, भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि भारतीय परराष्टÑ सेवेसह (आयएफएस) प्रतिष्ठित नागरी सेवेसाठी ८२९ उमेदवार पात्र झाले असून, देशभरातून भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी प्रदीप सिंह यांनी प्रथम स्थान पटकावले आहे.
पहिल्या तीन अग्रणी उमेदवारांत प्रदीप सिंह, जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा यांचा समावेश आहे. सिंह हे हरयाणाचे आहेत, तर जतीन किशोर दिल्लीचे आणि वर्मा उत्तर प्रदेशच्या आहेत. जतीन किशोर हे भारतीय आर्थिक सेवेतील (आयईएस) अधिकारी असून, सध्या ते ग्रामीण विकास मंत्रालयात सहायक संचालक आहेत. प्रतिभा वर्मा आयआरएस अधिकारी आहेत.
प्रतिष्ठित नागरी सेवेसाठी निवड झालेल्या ८२९ उमेदवारांना मिळालेले गुण पंधरा दिवसानंतर यूपीएसीच्या वेबसाईटवर जारी केले जाणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे परीक्षा, मुलाखतीसोबत निकाल घोषित करण्यास १८ महिने लागले. यापैकी १८० जणांची आयएएस, २४ जणांची आयएफएस आणि १५० उमेदवारांची आयपीएससाठी निवड झाली आहे. ४३९ ग्रुप ए, १३५ जण ग्रुप बी सेवेसाठी पात्र ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
एकूण यशस्वी उमेदवारांत ३०४ सर्वसाधारण प्रवर्गातील असून, ७८ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, २५१ इतर मागासवर्गीय, १२९ अनुसूचित जाती आणि ६७ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. अन्य १८२ उमेदवारांना राखीव यादीत ठेवण्यात आले असून, ११ उमेदवारांचा निकाल रोखण्यात आला आहे.आयएएस परीक्षेत देशभरातून द्वितीय क्रमांक मिळाल्याचा खूप आनंद आहे. हा माझा दुसरा प्रयत्न होता. शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रावर माझा भर राहीन, असे जतीन किशोर यांनी सांगितले. आयएएस अधिकारी होण्याची माझी बालपणापासूनच इच्छा होती. कोणत्याही संकटात आयएएस अधिकारी सर्वात आघाडीवर असतात. त्यामुळे आयआरएससाठी निवड झाल्यानंतर मी आयएएस होण्यासाठी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिभा वर्मा म्हणाल्या.सुखद आश्चर्य -प्रदीप सिंहच्हे स्वप्नच साकार झाल्यासारखेच आहे. माझ्यासाठी हे सुखद आश्चर्य आहे. आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती. समाजातील उपेक्षित घटकांसाठी मी काम करीन, अशी भावना प्रदीप सिंह यांनी व्यक्त केली. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर असेल. आयएएससाठी मी माझ्या राज्याची (हरयाणा) निवड केली आहे. शिक्षणासाठी २० वर्षांपूर्वी तेवडी गाव सोडून सोनिपतला राहायला आलो, त्याचे आज सार्थक झाले.च्प्रदीप सिंह यांचे वडील सुखबीर सिंह हे शेतकरी आहेत. मोठा अधिकारी होण्याचे मुलाचे स्वप्न होते; परंतु परीक्षेत त्याने पहिला क्रमांक पटकावला, ही गौरवाची बाब आहे, अशी भावना सुखबीर सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.