इंदूर : मध्यप्रदेशातील एका तरुणाने एकाच मांडवात दोन मुलींशी विवाह केल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. यातील एक मुलगी ही वराची प्रेयसी असून, दुसरी त्याच्या माता-पित्यांनी त्याच्यासाठी निवडलेली वधू आहे!संदीप उइके, असे या तरुणाचे नाव असून, तो मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील केरिया येथील रहिवासी आहे. बैतूल जिल्हा मुख्यालयापासून ४0 कि.मी. अंतरावर हे गाव आहे. केरिया गावातच त्याने एका मांडवात दोन वधूंशी विवाह केला. या लग्न सोहळ्यास गावकरी आणि वधू-वरांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. ८ जुलै रोजी हा विवाह सोहळा पार पडला.कोरोनाच्या काळात लग्न होणे अवघड झाले असताना संदीप उइके याने एकाच वेळी दोन-दोन मुलींशी लग्न केल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.संदीप उइके हा आदिवासी तरुण आहे. त्याची एक वधू होशंगाबाद जिल्ह्यातील, तर दुसरी घोडाडोंगरी गटातील कोयलारी गावाची आहे. संदीप उइके हा भोपाळ येथे शिकायला होता. तेथे त्याचा होशंगाबाद येथील तरुणीशी परिचय झाला. दोघे प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. भोपाळमध्ये हे सगळे सुरू असताना इकडे त्याच्या गावात त्याच्या आई-वडिलांनी त्याचा विवाह कोयलारी गावातील एका मुलीशी ठरवून टाकला. त्यातून संदीप उइके आणि दोन मुली, अशा तीन कुटुंबात वाद निर्माण झाला. तो मिटविण्यासाठी जात पंचायत बसविण्यात आली. दोन्ही मुली तयार असतील, तर संदीप उइके याने दोन्ही मुलींशी एकाच मांडवात विवाह करावा, असा निर्णय पंचायतीने दिला. आश्चर्य म्हणजे दोन्ही मुली तयारही झाल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी संदीप उइकेचा विवाह दोन वधूंशी धूमधडाक्यात लावून दिला.
एकाच मांडवात त्याने केला दोन वधूंशी विवाह!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 1:07 AM