पालिका मुख्यालय पडले ओस
By admin | Published: September 24, 2014 12:02 AM2014-09-24T00:02:13+5:302014-09-24T00:02:13+5:30
लोकसभा निवडणुकीत ठाणे महापालिकेचे ९० टक्के कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या सर्वच कामांवर झाला होता.
ठाणे : लोकसभा निवडणुकीत ठाणे महापालिकेचे ९० टक्के कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या सर्वच कामांवर झाला होता. त्यानंतर, आता पुन्हा विधानसभा निवडणूक लागल्याने पालिका मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालयेही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांअभावी ओस पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांची महिनाभरानंतरच सुटका होणार असल्याने आता नागरिकांची कामे दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा, विधानसभा अथवा पालिकेची निवडणूक असली तरीदेखील पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात येते. यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागामार्फत महापालिका प्रशासनाला रीतसर आदेश काढण्यात येतो. शिपायापासून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच ही कामे विभागून देण्यात येतात. नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांच्या नावांत बदल, मतदार यादीतील त्रुटी, मतदारांची यादी तयार करणे, मतदान पावत्यांचे वाटप अशा स्वरूपाची कामे असतात. यंदाही विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हा निवडणूक विभागाचे जसजसे आदेश येत आहेत, त्यानुसार निवडणूक कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येत असून त्यामध्ये पालिकेच्या सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वच विभागांतील मुख्यालयासह प्रभाग समितीमधील अर्ध्याहून अधिक अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामासाठी आतापर्यंत पाठवण्यात आले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अत्यावश्यक सेवा विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीच्या कामात गुंतवल्याने त्याचाही परिणाम झाल्याचे दिसून आले होते. पालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रेदेखील कित्येक दिवस बंद होती. आता विधानसभेची निवडणूक लागली असून टप्प्याटप्प्याने कर्मचारी, अधिकारी निवडणूक कामात गुंतले जात असल्याने त्याचा परिणाम आता विविध सेवांवर होऊ लागला आहे. त्यात महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळला असताना मालमत्ता, पाणीपुरवठा, शहर विकास विभाग, जाहिरात विभाग आदी महत्त्वाच्या विभागांतील कर्मचारीही निवडणुकीच्या कामात गुंतल्याने आता त्याचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावरदेखील होणार आहे. (प्रतिनिधी)