मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:35 AM2020-03-18T05:35:00+5:302020-03-18T05:35:30+5:30
मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने खरंच बहुमत गमावले आहे का याचा फैसला विधानसभेत कधी व कसा करावा याचा वाद आता भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने खरंच बहुमत गमावले आहे का याचा फैसला विधानसभेत कधी व कसा करावा याचा वाद आता भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. यावर उद्या बुधवारी सुनावणी होऊन काही मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.
कमलनाथ सरकारला विधानसभेत तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह १० भाजपा आमदारांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून उद्या तातडीने सुनावणी घेण्याचे ठरविले. या सुनावणीत सहभागी होण्यासाठी १७ बंडखोर काँग्रेस आमदारांनीही अर्ज केला आहे. कोरोनामुळे अधिवेशन २७ पर्यंत तहकूब असूनही विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाविरुद्ध काँग्रेसने याचिका केली आहे.
लोकशाहीची हत्या
भाजपाने पळवून डांबून ठेवलेले आमदार मुक्त झाल्याखेरीज विश्वासदर्शक ठरावाची बळजबरी करणे ही लोकशाहीची हत्या आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
बंडखोरांशी संपर्क साधू द्यावा -काँग्रेस
नवी दिल्ली : मध्यप्रदेश काँग्रेस पक्षाने आपल्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधू दिला जावा म्हणून केंद्र सरकार आणि कर्नाटक राज्य सरकारला आदेश द्यावा, अशी मागणी केलेली याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केली.
मध्यप्रदेश विधानसभेत तात्काळ बहुमताची चाचणी घेतली जावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर बुधवारी आपले म्हणणे मांडण्यास न्यायालयाने कमल नाथ सरकारला आदेश दिला.
काँग्रेसनेही दाखल केली याचिका
केंद्रातील भाजपा सरकार सूत्रे हलवीत आहे. आमच्या आमदारांना भाजपाशासित कर्नाटकमध्ये नेऊन डांबून ठेवणे व राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचा तगादा लावणे हा त्याचाच भाग आहे, असा आरोप काँग्रेसच्या याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यपालांनी सांगूनही विश्वासदर्शक ठरावासाठी विधानसभेची बैठक आज मंगळवारी घेण्यात आली नाही.
काँग्रेसचे आणखी २० आमदार आमच्यासोबत -बंडखोरांचा दावा
बंगळुरू : मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या आमदारांनी काँग्रेसमधील आणखी आमदार आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचा व येत्या काही दिवसांत ते भाजपमध्येही येण्याचा विचार करतील असा दावा मंगळवारी येथे केला.
बंगळुरूत आल्यापासून व आपले पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिल्यानंतर प्रथमच वार्ताहरांशी बोलताना हे २२ आमदार म्हणाले की, कोणत्याही परिणामांना तोंड देण्यास आम्ही तयार आहोत. ‘‘ज्योतिरादित्य शिंदे हे आमचे नेते आहेत.
अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्यासोबत राजकारण करीत आहोत व आमच्यापैकी अनेक जण हे त्यांच्याचमुळे राजकारणात आहेत. आम्ही अजूनही भाजपमध्ये दाखल होण्याचा विचार करीत आहोत.’’ आम्हाला जर केंद्रातील पोलिसांचे संरक्षण असेल, तर आम्ही मध्यप्रदेशमध्ये जाऊन त्यावर विचार करू, असे महिला आमदार
म्हणाल्या.
या आमदारांचा दावा असा आहे की, ‘‘आमच्यासोबत आणखी २० आमदार असले तरी त्यांना बंदी बनवून ठेवण्यात आले आहे. तेदेखील आमच्यासोबत आले तर काँग्रेस कोलमडून पडणार हे स्पष्टच आहे आणि त्या गटावर कोणताही कायदा लादला जाऊ शकणार नाही.’’ आम्ही कोणत्याही परिणामांना तोंड देण्यास तयार असून, आमच्या मतदारसंघांतील लोक आमच्यासोबत आहेत, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य शिंदे हे ११ मार्च रोजी भाजपमध्ये दाखल झाले.