ब्रिटन : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरारी झालेल्या नीरव मोदीला ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात अटक करण्य़ात आली होती. आज त्याच्या जामीनअर्जावर तेथील न्यायालयाने सुनावणी घेतली. यावेळी त्याचा जामीन नाकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची ईडीने बदली केली आहे. महत्वाचे म्हणजे हा अधिकारीही सुनावणीसाठी ब्रिटनमध्ये गेलेला आहे.
नीरव मोदी विरोधात ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. गेल्या 9 दिवसांपासून नीरव तुरुंगात होता. न्यायालयात भारताकडून टोबी कॅडमन प्रतिनिधीत्व करत आहेत. जर नीरव मोदीला जामिन मिळाला तर आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचे कॅडमन यांनी सांगितले. मोदीला तुरुंगात ठेवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
तर दुसरीकडे ईडीने सहाय्यक संचालक सत्यव्रत कुमार याच्या बदलीचा आदेश शुक्रवारी काढला. कुमार हे नीरव आणि मल्ल्या यांच्या तपासावर निरिक्षक होते. नीरव मोदीवरील सुनावणीसाठी ते सध्या लंडनमध्ये गेले आहेत, आणि ते वेस्टिमिंस्टर न्यायालयात उपस्थित आहेत.
न्यायालयात भारताची ईडी आणि सीबीआय अधिकाऱ्यांची एक टीम पोहोचलेली आहे. या टीमकडे मोदीविरोधात पुरावे आहेत. आणखी काही पुरावे या टीमने न्यायालयात सादर केले आहेत. तसेच कॅडमन यांनी नीरव मोदीचा जामिन नाकारण्यासाठी तो जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करेल आणि साक्षीदारांनाही धमकावेल, असा आरोप केला आहे. तसेच तो भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करत नसल्याचे म्हटले आहे. स
तर नीरव मोदीच्या वकिलाने तो जानेवारी 2018 पासून ब्रिटनमध्ये राहत असून लपून राहत नाही. तसेच जर त्याला जामीन देणार नसाल तर त्याला नजरकैदेत ठेवण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. तसेच त्याला स्थानिक पोलिस ठाण्यात रोज हजेरी लावण्याचे आणि मोबाईल देण्याची मागणीही केली होती.