भारतीयांच्या हृदयाची धडधड सरासरीपेक्षा जास्त, ‘इंडियन हार्ट स्टडी’चा अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 08:46 AM2019-08-28T08:46:37+5:302019-08-28T08:47:08+5:30
पश्चिम बंगालमध्ये या अभ्यासात जे लोक सहभागी होते त्यांच्यापैकी २२.५० टक्क्यांना व्हॉईट-कोट हायपरटेन्शन होते, तर १७.३० टक्के लोकांना मास्कड हायपरटेन्शन आढलले.
कोलकाता : भारतीय लोकांच्या हृदयाची एका मिनिटाला होणारी स्पंदने (रेस्टिंग हार्ट रेटस) सरासरी ८० आहेत, तर वैद्यकीय शास्त्रानुसार ती ७२ असायला हवीत, असे इंडियन हार्ट स्टडीला (आयएचएस) आढळले आहे. भारतीयांचा रक्तदाब इतर देशांतील लोकांच्या रक्तदाबाच्या तुलनेत सकाळच्या तुलनेत सायंकाळी जास्त असतो, याकडेही आयएचएसने लक्ष वेधले आहे.
मास्कड हायपरटेन्शन हा असा प्रकार आहे की, व्यक्तीचा रक्तदाब हा रुग्णालयात सामान्य दिसतो; पण घरी तो जास्त असतो, तर व्हॉईट - कोट हायपरटेन्शन ही अशी स्थिती आहे की, तिच्यात लोकांचा रक्तदाब रुग्णालयातच सामान्य पातळीच्या वरचा दिसतो. आयएचएसच्या अभ्यासाच्या निष्कर्षात भारतीयांत ते जेव्हा डॉक्टरांना रुग्णालयात पहिल्यांदा भेटतात तेव्हा ४२ टक्क्यांमध्ये मास्कड हायपरटेन्शन आणि व्हॉईट-कोट हायपरटेन्शन असल्याचे दिसले.
पश्चिम बंगालमध्ये या अभ्यासात जे लोक सहभागी होते त्यांच्यापैकी २२.५० टक्क्यांना व्हॉईट-कोट हायपरटेन्शन होते, तर १७.३० टक्के लोकांना मास्कड हायपरटेन्शन आढलले. व्हॉईट-कोट हायपरटेन्सिव्हज्च्या रक्तदाबाचे चुकीचे निदान (मिसडायगोनाईज्ड) केले गेले व त्यांना उच्चरक्तदाबविरोधी औषधे दिली गेली. त्यामुळे ते अनावश्यक औषधे घेत गेले, तर मास्कड हायपरटेन्सिव्ह रुग्ण निदान न होताच राहू शकतात व या लोकांना मूत्रपिंड, मेंदू व हृदयाच्या गुंतागुंतीची मोठी जोखीम वागवावी लागते. यातून त्यांना अकाली मृत्यूही येऊ शकते, असे हा अभ्यास म्हणतो. उच्च रक्तदाबाचा जवळचा संबंध हा रक्तवाहिन्या आकुंचन पावणे, छातीत वेदना (चेस्ट पेन) किंवा पक्षाघात, अशा हृदयाशी संबंधित आजारांशी आहे आणि हे आजार भारतात वाढत आहेत.
आम्ही आमच्या रक्तदाबाकडे सतत लक्ष देऊन त्याच्याशी संबंधित आजारांना कमी करण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली पाहिजे, असे डॉ. कुमार म्हणाले. येथील खासगी रुग्णालयातील मूत्रपिंडतज्ज्ञ डॉ. ललित कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) असलेल्या लोकांना त्यांच्या मूत्रपिंडांची हानी होण्याचा धोका नेहमी असतो. हा अभ्यास जे लोक उच्च रक्तदाबविरोधी औषधे घेत नाहीत अशांवर केला गेला रक्तदाबाच्या रीडिंग्ज सर्वसमावेशक प्रक्रियेने घेतल्या गेल्या. (वृत्तसंस्था)
काय म्हटले आहे अभ्यासात?
- ताणामुळे (स्ट्रेस) वाढलेला रक्तदाब (व्हॉईट- कोट हायपरटेन्शन), रुग्णालयात किंवा कार्यालयात सामान्य असलेला; परंतु त्याबाहेर पडल्यावर वाढलेला रक्तदाब (मास्कड हायपरटेन्शन) आणि भारतीय लोकसंख्येत प्रचलित असलेली हृदयाची स्पंदने यांच्याबद्दलची सूक्ष्मदृष्टी या अभ्यासाने आम्हाला दिली, असे येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस आणि रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठानच्या हृदयरोगशास्त्र विभागाचे प्रमुख आणि आयएचएसचे समन्वयक प्रो. डॉ. सौमित्र कुमार यांनी सांगितले.
- उच्च रक्तदाबाविरोधात औषधाची मात्रा (डोसेज) देण्याच्या वेळेचा फेरविचार करण्यासाठी १९ डॉक्टरांनी हा अभ्यास केला.
- आयएचएसने केलेल्या अभ्यासात 18918 लोक (स्त्रिया व पुरुष) सहभागी झाले होते. त्या आधारे हे निष्कर्ष समोर आले.
- 15 राज्यांतील ३५५ शहरांत केला अभ्यास. एप्रिल २०१८ पासून नऊ महिने करण्यात आला.