मानसरोवर यात्रेतील सर्वात खडतर टप्प्यासाठी हेलिकॉप्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 04:40 AM2018-06-21T04:40:09+5:302018-06-21T04:40:09+5:30

मानसरोवर यात्रेतील सर्वात कठीण अशा सलग १८ किमी सरळ चढाच्या ज्या टप्प्यात यात्रेकरूंना सर्वात जास्त त्रास होतो तेथे त्यांना हेलिकॉप्टरने घेऊन जाण्याची ‘एअर ब्रिज’ सेवा भारतीय हवाई दलाने सुरु केली आहे.

Helicopter for the most difficult phase of Mansarovar pilgrimage | मानसरोवर यात्रेतील सर्वात खडतर टप्प्यासाठी हेलिकॉप्टर

मानसरोवर यात्रेतील सर्वात खडतर टप्प्यासाठी हेलिकॉप्टर

Next

नवी दिल्ली : मानसरोवर यात्रेतील सर्वात कठीण अशा सलग १८ किमी सरळ चढाच्या ज्या टप्प्यात यात्रेकरूंना सर्वात जास्त त्रास होतो तेथे त्यांना हेलिकॉप्टरने घेऊन जाण्याची ‘एअर ब्रिज’ सेवा भारतीय हवाई दलाने सुरु केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या विनंतीवरून हवाई हवाई दलाने सुखावह व सुरक्षित यात्रेसाठी ही सोय केली आहे.
या ‘एअर ब्रिज’ सेवेत हवाई दलाची हेलिकॉप्टर्स उत्तराखंडमधल पिठोरगढ येथील नैनी सैनी धावपट्टीवरून उड्डाण करतात आणि यात्रेकरूंना गुंजी येथील बेस कॅम्पवर नेऊन सोडतात. यंदाच्या मानसरोवर यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला १८ जून रोजी याप्रकारे हेलिकॉप्टरने नेण्यात आले. दररोज ६० ते ८० या प्रमाणे यंदा एकूण १,०८० यात्रेकरूंची अशा प्रकारे हवाई वाहतूक केली जाणे अपेक्षित आहे.
>हा आहे १८ किमीचा सरळ चढाचा टप्पा
मानसरोवर यात्रेतील लखनपूर ते गुंजी हा सलग १८ किमी सरळ चढाचा टप्पा सर्वात खडतर मानला जातो. विरळ हवेमुळे होणारे प्रकृतीचे त्रास याच प्रवासात सर्वात जास्त होतात. शिवाय, या मोसमात तेथे दरडी कोसळण्याचाही सतत धोका असतो. विशेषत: लखनपूर ते नाझांग दरम्यानचा ६७० मीटरचा पट्टा सर्वाधिक धोकादायक मानला जातो. हेलिकॉप्टर प्रवासामुळे यात्रेकरूंचा हा प्रवास सुरक्षित होईल.
>वेस्टर्न कमांडची कामगिरी : हवाई दलाने ही जबाबदारी पश्चिम कमांडकडे सोपविली आहे. तेथील वैमानिक डोंगराळ भागात हेलिकॉप्टर चालविणे व उंचावरील जागी सुखरूप उतरविण्यात तरबेज आहेत. हवाई दलाने त्यांच्या ‘कृपाण’ व ‘नुब्रा वॉरियर्स’ तुकड्यांमधील एमएलएच प्रकारची हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. यात्रेकरूंना गुंजीला नेऊन सोडणे व गुंजीहून पिढोरागढला आणण्याचे काम ही हेलिकॉप्टर्स करतील. शिवाय, वेळीच गुंजी येथे पोहोचल्याने त्यांना गुंजी येथे मुक्काम करून विश्रांतीही घेता येईल. गुंजी बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून 3100 मीटर उंचीवर आहे.

Web Title: Helicopter for the most difficult phase of Mansarovar pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.