सिमला - हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे प्रत्येक तासागणिक बदलत आहेत. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात होऊन चार तास लोटत असताना काँग्रेसने बाजी पलटवली आहे. तसेच ६८ जागा असलेल्या विधानसभेत ३७ जागांवर आघाडी घेत स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये बहुमत मिळवण्यासाठी ३५ जागांची आवश्यकता असते.
हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीमध्ये सुरुवातीला काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू होती. मात्र मतमोजणीच्या उत्तरार्धामध्ये काँग्रेसने आपली आघाडी वाढवत नेली. तर भाजपा पिछाडीवर पडत गेला. सध्याच्या कलांनुसार काँग्रेस ३७ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा २८ जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्षांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे.
मात्र हिमाचल प्रदेशमध्ये अनेक मतदारसंघात उमेदवारांच्या आघाडी पिछाडीमधील अंतर कमी असल्याने संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तसेच सध्या बहुमताजवळ असलेल्या काँग्रेसच्या काही जागा घटल्यास अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.