शिमला:हिमाचल प्रदेशातील सिरमौरमध्ये भूस्खलनानंतर रस्ता बंद झाल्याची घटना घडली आहे. बरवासजवळ नॅशनल हायवे 707 वर ट्रॅफिक थांबवण्यात आले असून, भूस्खलनामुळे डोंगलारा मोठे तडे गेल्यांचही सांगण्यात येत आहे. तसेच, या भूस्खलनामुळे रस्त्यावरही मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे शेकडो लोक ट्रॅफिकमध्ये अडकले असून, गाड्यांची मोठी रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हवामान खात्याने सांगितल्यानुसार, 1 ऑगस्टपर्यंत देशातील पूर्व, पश्चिमी आणि मध्य भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, शुक्रवारी बिहार, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंडसह देशातील अनेक ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरातही आज मुसळधार येण्याची शक्यता आहे. तिकडे उत्तराखंडमध्येही दोन ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
किन्नौरमध्ये भूस्खलनात नऊ जणांचा मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किन्नौर जिल्ह्यात बटसेरीच्या गुंसा जवळ छितकुलहून सांगलाकडे जाणारी पर्यटकांची गाडी भूस्खलनात सापडली. यात गाडीवर मोठ-मोठे दगड पडून नऊ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. भूस्खलनामुळे गावासाठी बास्पा नदीवर तयार करण्यात आलेला कोरोडो पूल तुटून गावाचा संपर्क तुटला.