मुंबई - शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत वादात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी उडी घेतली आहे. कंगनी ही हिमालच प्रदेशची कन्या आहे. त्यामुळे, ठाकूर यांनी कंगनाला आपला पाठिंबा देत शिवसेनेला टार्गेट केलंय. 'आम्ही हिमाचलच्या सुपुत्रीचा अपमान सहन करणार नाही' असं म्हणत त्यांनी कंगनावर महाराष्ट्र सरकारकडून सूडाच्या भावनेनं अत्याचार होत असल्याचं म्हटंलय.
कंगनाने बुधवारी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं होत. आता कंगनाला हा एकेरी उल्लेख महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार नितीश माने यांनी कंगना हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे तुझे क्या लगता है! कि तुने फिल्म माफिया के साथ मिल के मेरा घर तोडकर बडा बदला लिया है असे शब्द वापरलेला बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केला म्हणून तक्रार दाखल केली. त्यामुळे, कंगना आणि शिवसेना वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता या वादात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी भूमिका घेतली आहे.
'आम्ही हिमाचलच्या मुलीचा अपमान सहन करू शकत नाही. महाराष्ट्र सरकारनं हिमाचलची मुलगी कंगना रानौत हिच्यासोबत राजकीय सूडाच्या भावनेतून केलेला अत्याचार अत्यंत चिंताजनक तसंच निंदनीय आहे. आमचं सरकार आणि देशातील जनात या घटनाक्रमात हिमाचलची मुलगी कंगनासोबत आहोत' असं ट्विट मुख्यमंत्री ठाकूर यांनी केलं आहे. ठाकूर यांच्या ट्विटमुळे दोन राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
दरम्यान, कंगना राणौतच्या कार्यालयाला मुंबई महापालिकेने तोडल्याने ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करू लागली आहे. काही तासांपूर्वी एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेना आव्हान दिले होते. आता पुन्हा कंगनाने ठाकरेंना आव्हान दिले आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.
कंगनाच्या बंगल्यावर कारवाई केल्यानं शरद पवारांची नाराजी
अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई करण्याची वेळ चुकीची आहे. मुंबईत अनेक अवैध बांधकामे आहेत. अशा कारवाईमुळे निष्कारण शंकेची पाल चुकचुकते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. कंगना रणौतवरून सुरू असलेल्या वादावर खा. पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही विधान केले अथवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. कारण मुंबई पोलिसांची कामगिरी सर्वांनाच ठाऊक आहे. प्रसिद्धी माध्यमांनीसुद्धा थोडे तारतम्य बाळगून, अशा गोष्टींना प्रसिद्धी दिली पाहिजे. शहाण्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये असंही शरद पवार म्हणाले.