झाशी – महाराष्ट्रासह देशभरात भोंग्याचे राजकारण सुरू असून मशिदीवरील लाऊडस्पीकर उतरवण्यावरून इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तर राज्याबाहेरही अनेक हिंदु संघटना यावरून आक्रमक झाल्या आहेत. त्याचवेळी झाशीतील बडागावमध्ये हिंदु मुस्लीम ऐक्याचं प्रतिक पाहायला मिळालं.
या गावातील मंदिर आणि मशिदीवरील भोंगे स्वच्छेने उतरवण्याचा निर्णय दोन्ही समाजातील लोकांनी घेतला आहे. गावात शांतता भंग होऊ नये आणि माणुसकी टिकून राहावी यासाठी दोन्ही समुदायाने प्रार्थनास्थळावरील भोंगे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पुजारीने राम जानकी मंदिरातील लाऊडस्पीकर आणि मौलवी यांनी मशिदीवरील भोंगे उतरवत आदर्श उदाहरण ठेवले आहे. गावच्या या निर्णयामुळे परिसरात पुजारी आणि मौलवी यांचं कौतुक केले जात आहे.
अलीकडेच धार्मिक स्थळावरील आणि कार्यक्रम आयोजनात लाऊडस्पीकरच्या आवाजावरून झालेल्या वादामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मार्गदर्शक सूचना जारी केली होती. भोंग्याचा आवाज तितकाच ठेवला जो बाहेरील परिसरात ऐकायला येणार नाही. त्यामुळे कुणालाही त्याचा त्रास होणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या आदेशानंतर गोरखपूर मंदिरात आणि मथुरा येतील श्रीकृष्ण मंदिरात २३ एप्रिलनंतर लाऊडस्पीकरचा आवाज कमी केल्याचं दिसून आले. त्याचसोबत परिसरातील मशिदीत ईदगाहच्या नमाजावेळीही लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला नाही.
याप्रकरणी शाही मशिदीच्या कार्यकारणी समितीचे सचिव तनवीर अहमद यांनी म्हटलं की, मशिदीवरील ३ लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. कमी आवाजात केवळ १ स्पीकर सुरू ठेवला आहे. मशिदीवरील भोंग्याचा आवाज बाहेरील परिसरात ऐकायला जाणार नाही असा ठेवला आहे. धार्मिक सलोखा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं त्यांनी सांगितले. मशिदीवरील भोंगे हटवले पाहिजेत अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात केली होती. त्यानंतर त्यांनी सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम देत मौलवींशी चर्चा करा आणि भोंगे हटवा असा इशारा दिला होता. ३ मे पर्यंत भोंगे हटले नाहीत तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावत हनुमान चालीसा वाजवली जाईल असं सांगितले. राज ठाकरेंनी महाराष्ट्रासह देशभरातील हिंदूंना तयार राहण्याचं आवाहन दिले होते. त्यानंतर राज्याबाहेरही अनेक हिंदु संघटना लाऊडस्पीकर वादात पुढे आल्या होत्या.