जयपूर : गेल्या वर्षी अलवर जिल्ह्यात गोमांस तस्करी करीत असल्याचा आरोप करीत पहलू खान नामक व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला होता. याचे पडसाद देशभर उमटले होते.या घटनेनंतर राजस्थानात अन्य सात ते आठ जण गोमांस तस्करी करीत असल्याच्या संशयावरून जमावाची शिकार ठरले होते. त्यामुळे काँग्रेस आणि देशभरातील विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.राजस्थानच्या निवडणुकीत काँग्रेस या मुद्द्यांवरून भाजपाला ‘टार्गेट’ करेल, अशी अपेक्षा मुस्लीम समाजाला होती. मात्र, काँग्रेसने त्यांचा अपेक्षाभंग केला. मुस्लीम लांगुलचालनाचा शिक्का बसू नये, म्हणून प्रयत्न करताना काँग्रेस काहीशी हिंदुत्वाच्या पांघरुणात अडकली. त्यामुळेच त्यांच्या प्रचार सभांमधून मुस्लिमांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे विश्लेषकांना वाटत आहे.