जोधपूर (राजस्थान) - राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत , विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला प्रचार आता श्रीराम आणि हिंदुत्वापर्यंत पोहोचला आहे. प्रचारादरम्यान, नरेंद्र मोदी यांना खरा हिंदू धर्म समजला नसल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांना मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे. जोधपूर येथे प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकेकाळी जे श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणत होते तेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनू पाहत आहेत, असा टोला काँग्रेसला लगावला आहे. जोधपूर येथे मोदी म्हणाले, ''काँग्रेसचे नेते राजस्थानच्या विकासाबाबत काहीही बोलताना दिसत नाहीत. तर राहुल गांधी म्हणतात, मोदींना हिंदू धर्माचे ज्ञान नाही. पण हिंदू धर्म हा निवडणुकीतील मुद्दा आहे का? हिंदुत्व हा एक वारसा आहे. हिंदू धर्माचे ज्ञान एवढे विशाल आहे की कुणही हिंदुत्वाचे ज्ञान आपणास आहे, असा दावा करू शकत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे ज्ञान त्यांनाच लखलाभ होवो. त्यांच्या ज्ञानामुळे देशाचे मनोरंजन होते.''
एकेकाळी काँग्रेसने श्रीराम हे काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिल्याचाही उल्लेख मोदींनी यावेळी केला. ''आज काँग्रेस पक्ष हिंदुत्वाची ठेकेदारी घेऊ पाहत आहे. पण मनमोहन सिंग यांचे सरकार असताना याच काँग्रेस पक्षाने भगवान श्रीराम यांच्या अस्तित्वाचे कुठलेही ऐतिहासिक प्रमाण नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात देत श्रीराम हे काल्पनिक पात्र असल्याचे म्हटले होते,'' असे मोदींनी सांगितले. तसेच सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसला घेरले.