नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आणि राज्यसभेमध्ये गोंधळ उडाला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. मात्र, त्यास अमित शहा यांनी उत्तर देत जम्मू काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव संमत करून घेतला. यावेळी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदींना इशारा दिला.
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपा जातीयवादाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. यानंतर पी चिदंबरम यांनीही या प्रस्तावाला विरोध दर्शविला. मोदी सरकार प्रचंड बहुमताने विजयी झाले आहे. मात्र, त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. मोदी सरकारला इतिहास चूक दाखवून देईल. काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढणे ही मोठी चूक होती हे पुढील पीढीच्या लक्षात येईल, असे सांगितले.
विरोधकांच्या टीकेनंतर अमित शहा यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले. जम्मू-काश्मीरचेकलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर भाजपा व्होटबँकेचे, जातीयवादाचे राजकारण करत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र, काश्मीरमध्ये केवळ मुस्लिमच राहतात का? तुम्हाला काय म्हणायचे आहे. काश्मीरमध्ये मुस्लिम, हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्टही राहतात. जर 370 कलम चांगले असेल तर ते सर्वांसाठी चांगले आणि जर वाईट असेल तर सर्वांसाठी वाईटच असणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.