पाटणा - बिहारच्या रामचंद्र मांझी यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कलेच्या कोसो दूर फेकून दिलेल्या लौंडा नाच या कलाकृतीच्या बादशहाचा राजदरबारी सन्मान होत आहे. तोंडाला पावडर, ओठाला लिपस्टीक, तोंडावर घागरा अन् अंगावर चोळी, कानात झुमके, गळ्यात नेकलेस, माथ्यावर बिंदी अशा पेहरावात स्टेजवर तब्बल ९३ वर्षांचा ‘लौंडा' रामचंदर मांझी यांची एन्ट्री होते. आपल्या खास भोजपुरी शैलीत रामचंदर गाऊ लागतात, ढोलकच्या ठेक्यावर कमरेला लटके देत नृत्य करू लागतात अन् टाळ्या शिट्ट्यांनी माहोल बदलून जातो. गेल्या 70 वर्षांपासून आपल्या अदाकारीने, कलाकारीने बिहारच्या लोकांचं मनोरंजन करणाऱ्या मांझी यांचा गौरव यंदा सरकारने केला आहे.
भोजपुरीचे शेक्सपियर असलेल्या भिखारी ठाकूर यांच्या शिष्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने बिहारच्या कला विश्वात आनंदाचं अन् आशेचं वातावरण निर्माण झालंय. कारण, नजरेआड चाललेल्या लौंडा नाच या कलाप्रकाराला नवसंजीवनी देण्याचं कामचं सरकाने केलंय. येथील सारण जिल्ह्यातील तुजारपूर येथील एका अत्यंत गरिब कुटुंबातील रामचंद्र मांझी यांना 2017 मध्ये संगीत नाटक अकॅडमी अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासूनच त्यांनी आपल्या गुरू भिखारी ठाकूर यांच्यासमेवत स्टेजवर नाचायला सुरुवात केली होती. 1971 पर्यंत गुरुंच्या छत्रछायेखालीच त्यांनी काम केलं. मात्र, बिहारचे शेक्सपियर म्हणून नावलौकिक असलेल्या भिखारी ठाकूर यांच्या निधनानंतर रामचंद्र मांझी यांनी इतर काही मित्र कलाकारांसमवेत स्वत:चा फड सुरू केला. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लौंडा नाच या कलाप्रकाराला चांगले दिवस येतील, अशी आशा मांझी यांनी व्यक्त केलीय.
आईये, आईये... अब आप के सामने आ रही है अपने जमाने केशिरीदेवीना नातो, अमिताभ बच्चनअरे ना रे माधेवो तो अपने रामचंदर मांझी है रे...
प्रचंड टाळ्या आणि शिट्यांच्या कडकडाटात ... अशी एंट्री स्टेजवर व्हायची अन् पब्लीक अंगात आल्यागत नाचायला, टाळ्या व शिट्या वाजवायला सुरु करायचं. स्त्रीचा वेश धारण करून रामचंद्र मांझी गाणं सादर करतात. त्या सादरीकरणाला संबंध बिहारमध्ये ओळखलं जातं "नाच'या नावाने. "माझं सगळं आयुष्य मी भिखारी ठाकूर आणि "नाच'ला समर्पित केलं होतं. इतकं की माझ्या लग्नाच्या दिवशीही मी कार्यक्रम सादर करून आलो होतो आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीही "नाच' करायला गेलो होतो. सुरैय्या, मधुबाला, साधना या जुन्या नट्यांसोबत मी "नाच' केलाय. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, जयप्रकाश नारायण, जगजीवन राम, नितीश कुमार, शरद यादव, रामविलास पासवान यांच्यासमोर माझे कार्यक्रम झाले असले तरी, राजकीय नेत्यांमध्ये लालुप्रसाद यादव यांनी मात्र माझ्यावर खूप प्रेम केलं. जेव्हाही लालुप्रसाद मला भेटत, तेव्हा ते नेहमी हेच म्हणायचे की, रामचंद्रजी आप जबतक जियें, भिखारी ठाकूरको जिंदा रखें. मात्र, इतकं करूनही माझ्या कुटुंबाने मात्र आजपर्यंत माझा कार्यक्रम पाहिलेला नाही. याच कारण आमच्या या कलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन' एकेकाळी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारी, ही कला आता खरोखरच अश्लील संवाद, अचकट-विचकट हावभाव अशा स्वरुपात सादर केली जाते. पूर्णपणे ऑर्केस्ट्राकरण झालेल्या या जमान्यात पारंपरिक कलावंत भरडले जात आहेत. त्यामुळेच, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बिहारी गाण्यांची चर्चा ही कलाकृतीपेक्षा अश्लीलतेवरच होते. सपना चौधरी यांनीही भोजपुरी गाण्यांतील ठुमक्यामुळे आपलं नाव केलंय. मात्र, ते केवळ मनोरंजन आहे. रामचंद्र मांझी यांनी समाजव्यवस्थेवर प्रहार करण्याचं, आघात करण्याचं काम आपल्या कलेतून केलं होतं. मराठी लावणी प्रकरात नाच्याची भूमिका करणारे गणपत पाटील जसे अजरामर झाले, तसेच पद्मश्री पुरस्कारमुळे आता रामंचद्र मांझीही महान कलावंत बनले आहेत.