नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी सहा मित्रांवर काळाचा घाला! पार्टी करून परतताना कार अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:10 PM2024-01-01T12:10:14+5:302024-01-01T12:15:59+5:30
झारखंडमध्ये काल भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
झारखंडमधील जमशेदपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नव्या वर्षीची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांचा कारच्या अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात कार दुभाजकाला धडक दिल्यामुळे झाला. ही घटना बिस्तुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्किट हाऊस परिसरातील चौकाजवळ घडली.
रेव्ह पार्टी उधळली, ९५ नशेबाज ताब्यात; पाच मुलींचाही समावेश, ठाण्यात ८ लाखांचे अमली पदार्थ जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, वेगात असलेली अनियंत्रित कार आधी दुभाजकाला धडकली आणि नंतर झाडावर आदळली आणि उलटली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या सहा तरुणांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की त्याचा आवाज दूरवर ऐकू आला आणि तो ऐकून आजूबाजूचे लोक घराबाहेर पडले.
या अपघाताची माहिती स्थानिकांना पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि जखमींना बाहेर काढले. आता पोलीस मृत तरुण पार्टी साजरी करण्यासाठी कुठे गेले होते याचा शोध घेत आहेत. नवीन वर्ष साजरे करून हॉटेलमधून परतत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळ होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. अपघातग्रस्त कारमधून मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. सहाही मृत आरआयटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलुपटांगा येथील रहिवासी होते.
या अपघातात २ मित्र वाचले आहेत. तर या घटनेत जखमी झालेल्या रविशंकरचे वडील सुनील झा यांनी सांगितले की, या अपघातात ६ तरुणांचा मृत्यू झाला, मात्र त्यांचा मुलगा बरा आहे. ज्या वाहनात हा अपघात झाला त्यात एकूण ८ जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ तरुणांचे प्राण वाचले. सर्व तरुण बाबा आश्रम परिसरातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले.