नवी दिल्ली : गाडी चोरी होण्याच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. जर हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्यास त्याची नुकसानभरपाई हॉटेलला द्यावी लागणार असल्याचे निकालात म्हटले आहे. हा निर्णय न्यायालयाने ताज हॉटेल विरुद्ध युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या प्रकरणात दिला आहे.
जर एखादा ग्राहक हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या गाडीची चावी देत असेल आणि पार्किंगमध्ये गाडीचे संरक्षण हॉटेलच करणार आहे. यावेळी गाडी चोरी झाल्यास किंवा तिचे नुकसान झाल्यास हॉटेलच नुकसानभरपाई देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्लीचे हॉटेल ताजमहालमधून 1998 मध्ये गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणाचा निकाल आता आला आहे. मारुतीची झेन कार चोरीला गेली होती. न्यायालयाने तब्बल 20 वर्षांनी निकाल देत ताज हॉटेलला 2.8 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्राहकाने ज्या स्थितीत वाहन दिले आहे त्या स्थितीत त्याला ते परत मिळायला हवे. पार्किंग मोफत दिले होते, ही सबब चालणार नाही. जर ते पार्किंग हॉटेल देत असेल तर त्या वाहनाची जबाबदारी हॉटेल प्रशासनाची राहील.
हॉटेलवाले ग्राहकांकडून रूम भाडे, एन्ट्री फी, फूड असे अनेक बाबतीत पैसे आकारतात. यामुळे कार चोरीची भरपाई हॉटेललाच द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.