श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे गुरुवारी सकाळी एक दहशतवादी हल्ला झाला. श्रीनगरमध्ये असलेल्या नौगाम परिसरात एका भारतीय जनता पक्ष (BJP) नेत्याच्या घरावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. दहशदवाद्यांनी हल्ल्यानंतर पळून जाताना सुरक्षारक्षकाची रायफलही पळवून नेली असून, या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याला हौतात्म्य आले आहे. (terrorist attack on bjp leader house in nowgam area of srinagar jammu and kashmir)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौगामच्या अरीबागमध्ये राहणारे भाजप नेते अनवर खान यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार करत खान यांच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात घराबाहेरील गार्ड पोस्टवरील पोलीस कर्मचारी रमीज राजा गंभीर जखमी झाले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दहशतवाद्यांना पळ काढण्यात यश
दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा अनवर खान घरात नव्हते. या गोळीबारात जखमी झालेल्या रमीज राजा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. दहशतवादी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करुन त्याची रायफल घेऊन पळाले, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आणि सैन्याचे जवान घटनास्थळी
गेल्या चार दिवसात राजकीय नेत्यावर झालेला दुसरा दहशतवादी हल्ला आहे. नौगाम भागात दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सैन्याचे जवान घटनास्थळी पोहोचले. हशतवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी आणि सैन्याच्या जवानांनी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, आसपासच्या परिसरात चौकशी करण्यात येत आहे.
प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी; नितीन गडकरींची घोषणा
दरम्यान, सोपोरमध्ये बीडीसी चेअरपर्सन असलेल्या फरीदा खान यांच्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एका PSO सह दोन लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या फरीदा खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.