महिला टॉयलेटमध्ये गेल्यानंतर तो मोबाइल कॅमे-याने करायचा शूट, सॉफ्टवेअर कंपनीतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 11:34 AM2018-01-23T11:34:33+5:302018-01-23T11:50:05+5:30
कार्यालयात काम करणा-या महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवल्या प्रकरणी पोलिसांनी सॉफ्टवेअर कंपनीच्या हाऊसकिपिंग कर्मचा-याला अटक केली आहे.
बंगळुरु - कार्यालयात काम करणा-या महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवल्या प्रकरणी बंगळुरु पोलिसांनी सॉफ्टवेअर कंपनीच्या हाऊसकिपिंग कर्मचा-याला अटक केली आहे. धर्मेंद्र कुमार यादव असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. 11 जानेवारीला एका महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढताना कंपनीतील एका कर्मचा-याने त्याला पकडले. त्यानंतर धर्मेंद्रचा मोबाईला तपासताना त्यामध्ये कंपनीतील अनेक महिला कर्मचा-यांचे फोटो आणि व्हिडिओ सापडले.
काही फोटो आणि व्हिडिओ हे टॉयलेटमधील होते. महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी धर्मेंद्र विरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. 20 डिसेंबर ते 11 जानेवारी दरम्यान त्याने हे फोटो आणि व्हिडिओ काढले होते. पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला असून सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले आहेत.
जे फोटो आधी डिलिट झाले आहेत ते परत मिळवण्यासाठी फोन लॅबमध्ये पाठवला आहे असे पोलिसांनी सांगितले. आरोपी धर्मेंद्र त्याचा मोबाइल फोनचा कॅमेरा ऑन करुन फोन टॉयलेटमध्ये ठेऊन द्यायचा असे पोलिसांनी सांगितले. धर्मेंद्रने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.