- संतोष ठाकूर नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर व्हिलेज बनविण्याच्या तयारीत असलेल्या रस्तेबांधणी मंत्रालयाने त्याची पहिली चाचणी टोल रोडवर करण्याचे ठरविले आहे. दूर अंतराच्या टोल रोडवर वाहनचालकांसाठी विश्रामगृहे बनविली जाणार आहेत. तेथे वाहनांतील इतरही लोक थांबून आराम करतील. तेथे भोजन-पाण्याचीही सुविधा मिळेल.संबंधित टोल कंपनीनेच या सुविधा निर्माण करून द्यायच्या आहेत. दिल्ली-आग्रामधील जेपी एक्स्प्रेस हायवेवर ही सुविधा आहे. रस्ते बांधणी मंत्रालय ही सुविधा सर्व मोठ्या टोल रोडवर सुरू करू इच्छिते. मंत्रालयाने आधी हायवे व्हिलेज योजनेचा आराखडा तयार केला होता. त्यात ज्यांची जमीन महामार्गाशेजारी आहे, त्यांनीच कार, बस, ट्रकमधून ये-जा करणाऱ्यांसाठी खोल्या, भोजनाची सुविधा देण्याची अपेक्षा होती. पण काही निवडक जागा वगळता लोकांजवळ हायवे व्हिलेज स्थापन करण्याएवढी जमीन नाही. शिवाय तेथे काही त्रुटी असताना अधिक वसुली केल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न होता. यावर तोडगा निघेपर्यंत टोल रोडवरच ही सुविधा देण्याचे निश्चित झाले आहे.अर्थात हायवे व्हिलेजही सुरू करण्यात येणार आहेत. सुमारे एक हजार जागी हायवे व्हिलेज असतील. टोल रोडवर ही सुविधा देणे ही चाचणी असेल. त्याचे परिणामही उत्साहवर्धक आहेत. त्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल. यात टोल कंपनीला जमीन अधिग्रहणाची सुविधा दिली जाईल.>हायवेवरही देणार सुविधानितीन गडकरी यांनी नुकतेच ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे तयार करणार आहोत. येथील टोल रोडवर भोजन-पाणी, आराम, चहा-कॉफी व शौचालयाची सुविधा प्रत्येक ५०-६० किलोमीटरवर असेल.
आता टोल रोडवर बांधण्यात येणार विश्रामगृहे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 4:35 AM