पंतप्रधान मोदींनी सांगितलंच, देशात 'असा' असेल लॉकडाऊनचा चौथा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 08:44 PM2020-05-12T20:44:56+5:302020-05-12T20:48:36+5:30
जगभरात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्येही अनेक कुटुंबांनी त्यांचे सदस्य गमावले आहेत
मुंबई - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासंदर्भात माहिती देत देशवासीयांना संबोधित केले. कोरोनासारख्या एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. यापूर्वी आम्ही असे संकट ना पाहिले किंवा ऐकलेही नाही. हे कल्पनेपलिकडचे आहे. एकविसावे शतक भारताचे असावे, यासाठी आपली जबाबदारी आहे. म्हणून, एकच मार्ग आहे, स्वावलंबी भारत. शास्त्रामध्येही हेच सांगितले आहे, असे म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदींनी चौथ्या लॉकडाऊनसंदर्भातही संकेत दिले आहेत.
जगभरात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्येही अनेक कुटुंबांनी त्यांचे सदस्य गमावले आहेत. त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय नाही ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच मोदींनी जीडीपीच्या १० टक्के आर्थिक पॅकेजची घोषणा केली. म्हणजेच देशातील प्रत्येक नागरिकांसाठी, मजूरांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वच भारतीयांसाठी मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर, चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संदर्भातही मोदींनी महत्वाची सूचना केली.
Based on the suggestions by states, information related to lockdown 4 will be given to you before 18th May. We will fight Corona and we will move forward: PM Narendra Modi #COVID19https://t.co/PVUzknCKVV
— ANI (@ANI) May 12, 2020
कोरोनाच्या लढाईला आता थांबून जमणार नाही. कोरोनाला सोबत घेऊनच काही महिने जगावं लागेल असं अनेक तज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळेच, आपण थांबणाऱ्यांपैकी नाही. आपण तोंडाला मास्क वापरु, सोशल डिस्टन्सचे पालन करु आणि आपलं गतीमानता पुन्हा नव्या जोमाने सुरु करू, असे म्हणत लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात नियमात बदल करण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. तसेच, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारांना विशेष अधिकार देण्यात आले असून राज्यातील परिस्थिती पाहून ते निर्णय घेतले जाणार आहेत. यासंदर्भात १८ मे पूर्वा आपणा सर्वांना पुढील सूचना आणि नियमावली सांगण्यात येईल, असेही मोदींनी सांगितले.
दरम्यान, मोदींनी आजच्या भाषणात स्वावलंबनावर अधिक भर दिला. जेव्हा कोरोना संकट सुरु झाले तेव्हा भारतात एकही पीपीई किट बनत नव्हती. एन-९५ मास्कचे नाममात्रच उत्पादन होत होते. आज भारतात रोज दोन लाख पीपीई आणि मास्क बनविले जाऊ लागले आहेत. संकटाला संधीमध्ये बदलण्यात आले आहे. हे भारताला ताकदवान बनविण्यास मदत करणार आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. भारत जेव्हा स्वावलंबी होण्याची गोष्ट करतो, तेव्हा त्याची वकीली करत नाही. जी संस्कृती जगाचा विकास करू इच्छिते. जगाला घर मानते. भारताच्या कामाचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो. टीबी असेल, हागणदारी मुक्ती असेल जगावर त्याचा परिणाम झाला आहे. तणावातून मुक्ती देण्यासाठी भारताकडून जगाला भेट मिळाली आहे. जगाला विश्वास वाटू लागला आहे, भारत काही चांगले करू शकतो. पण प्रश्न आहे कसा? यावर उत्तर आहे १३५ कोटी लोकांनी केलेला स्वावलंबीपणाचा संकल्प यावर उत्तर आहे, असे मोदी म्हणाले.