योगी आदित्यनाथ जनतेचा पैसा भगवान श्री रामांचा पुतळा उभारण्यासाठी कसा वापरु शकतात ? - असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 02:51 PM2017-10-16T14:51:25+5:302017-10-16T15:34:25+5:30
उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येमध्ये भगवान श्री रामांचा 100 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्याची योजना आखली आहे.
हैदराबाद - उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येमध्ये भगवान श्री रामांचा 100 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्याची योजना आखली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावर हैदराबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सडकून टीका केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला विरोध करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही दाखला दिला आहे.
कुठलेही सरकार करदात्यांचा पैसा धार्मिक कार्यासाठी वापरु शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये 2002 दंगलीच्यावेळी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ पाडण्यात आले होते. त्या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांनी गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला व राज्य सरकारला मुस्लिमांच्या धार्मिक स्थळाचे जे नुकसान झाले त्यासाठी नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असे असदुद्दीन यांनी सांगितले.
जनतेचा पैसा जर धार्मिक स्थळांची पुर्नबांधणी, दुरुस्तीसाठी वापरला जात नसेल तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हाच पैसा भगवान श्री रामांचा पुतळा उभारण्यासाठी कसा वापरु शकतात ? असा सवाल असदुद्दीन यांनी विचारला.