हवाई हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:05 AM2019-03-05T06:05:40+5:302019-03-05T06:05:56+5:30
या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.
नवी दिल्ली : हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २५0 दहशतवादी मारले गेल्याचा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला असला तरी त्याच पक्षाचे उपाध्यक्ष व केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी मात्र हा हल्ला जीवितहानी करण्याच्या उद्देशाने करण्यात आला नव्हता, भारत कारवाई करू शकतो, हा संदेश देण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला, असे म्हटले आहे. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.
त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याविषयी भाजपामध्येच मतभेद असल्याचे दिसते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही परदेशी वृत्तपत्रांचा हवाला देत किती दहशतवादी मारले गेले, ही माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली होती.
तोच प्रश्न काँग्रेसचे नेते कपिल सिबल व दिग्विजय सिंह यांनी सोमवारी उपस्थित केला. वॉशिंग्टन फोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, टेलिग्राफ, रॉयटर्सच्या बातम्यांचा हवाला देत मोदी यांना सवाल केला की, जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे पुरावे द्यावेत. बालाकोट येथे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे कोठेही दिसत नाही.
त्यावर भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर म्हणाले की, असे पुरावे मागणे म्हणजे आपल्या हवाई दलावर अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे.