ओडिशा : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. दरम्यान, समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले की हवामान खात्याकडून त्याचे नामकरण केले जाते. वादळांची ही चमत्कारिक नावे देण्याचा प्रघात तसा जुनाच म्हणजे, गेल्या शतकभरातला आहे.
पाश्चिमात्य देशांकडून वादळांना नावे देण्याची सुरुवात झाली. ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचे नामकरण होते. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावे दिली जातात. प्रादेशिक वैशिष्ट्यांची नावे देण्याचाही विचार असतो. नावे देताना कुणाच्या भावना न दुखवण्याची सूचना दिली जाते. महासागरानुसार काही झोन तयार करण्यात आले आहेत. त्या-त्या झोनमधील देशांनी नावे सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळे येतील. तशी अनुक्रमे येणाऱ्या वादळांना नावे द्यायची हा नियम आहे. भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो.
कशी ठेवली जातात चक्रीवादळांना नावे?अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांची नावे 1953पासून ठरण्यास सुरुवात झाली आहे. हिंद महासागर क्षेत्रातील आठ देशांनी भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचे 2004पासून नामकरण करण्याची व्यवस्था करून दिली. या आठ देशांमध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी 8, अशी 64 नावे ठरवून दिली आहेत. भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावे सुचवलेली होती. आतापर्यंत चक्रीवादळांची 64 नावे ठेवण्यात आली आहेत. भारताने एका चक्रीवादळाला 'लहर' हे नाव दिले होते.
कसे तयार होते चक्रीवादळ?चक्रीवादळाचे शीतोष्ण आणि उष्ण असे दोन प्रकार असतात. जेव्हा शीत कटिबंधातून येणारी थंड हवा आणि उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण हवा एकत्र होते, तेव्हा समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यालाच चक्रीवादळ असे संबोधले जाते. या वादळांचा फटका समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागाला जास्त बसतो.