11 डिसेंबरनंतर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार? राहुल गांधींचं वजन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:47 PM2018-12-08T12:47:32+5:302018-12-08T12:48:49+5:30

राजस्थानसोबतच मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसने भाजपाला धक्का दिला, तर राहुल गांधी यांना नवं बळ मिळेल.

how the polical scenario will change if exit polls of 5 assembly elections becomes results | 11 डिसेंबरनंतर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार? राहुल गांधींचं वजन वाढणार?

11 डिसेंबरनंतर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार? राहुल गांधींचं वजन वाढणार?

Next
ठळक मुद्देराजस्थान तर भाजपाच्या हातून जाईलच, पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसला लक्षणीय यश मिळेल, असं एक्झिट पोल सांगताहेत. एक्झिट पोल खरे ठरल्यास 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार, हा प्रश्न भाजपाच्या चिंता वाढवणारा आहे. भाजपाचा पराभव झाल्यास अयोध्येतील राम मंदिराचा शंख फुंकला जाऊ शकतो, हिंदुत्वाचा नारा दिला जाऊ शकतो

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या मोठ्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 'अच्छे दिन' येण्याची शक्यता बऱ्याच एक्झिट पोल्सनी वर्तवली आहे. राजस्थान तर भाजपाच्या हातून जाईलच, पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसला लक्षणीय यश मिळेल, असं आकडे सांगताहेत. हे अंदाज ११ डिसेंबरला खरे ठरले, तर त्याचे देशाच्या राजकारणावर कसे परिणाम होतील, यावर एक दृष्टिक्षेप... 

१. राहुल गांधींचं वजन वाढणार!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक निवडणुका लढवल्या, पण त्यांच्या पदरी निराशाच अधिक पडली आहे. मात्र, हे एक्झिट पोल राहुल गांधींसाठी आणि काँग्रेससाठी दिलासादायक आहेत. राजस्थानसोबतच मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसने भाजपाला धक्का दिला, तर राहुल गांधी यांना नवं बळ मिळेल. २०१९साठी विरोधकांच्या ऐक्याचा जो प्रयत्न काँग्रेस करतंय, त्यात राहुल यांची स्वीकारार्हता वाढेल. स्वाभाविकच, भाजपासाठी ते मोठं आव्हान ठरेल. 

२. मोदींच्या करिष्म्याचं काय होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 'ब्रॅण्ड' म्हणूनच पाहिलं जातं. त्यांच्या करिष्म्याच्या जोरावर भाजपाने अनेक निवडणुका फिरवल्यात. लोकसभेच्या या सेमी फायनलमध्येही त्यांनी झंझावाती प्रचार केला. २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार आणायचं असेल तर या राज्यांमध्ये कमळ फुलवा, असाच प्रचार भाजपाने केला होता. आता एवढं होऊनही काँग्रेसनं बाजी मारली, तर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार, हा प्रश्न भाजपाच्या चिंता वाढवणारा आहे. 
  
३. वसुंधरांची 'राजे'शाही संपेल!

राजस्थानमध्ये भाजपाचं कमळ फुलेल, असं एकाही एक्झिट पोलचे आकडे सांगत नाहीत. जनतेनं खरोखरच काँग्रेसला हात दिला, तर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राजेशाही संपुष्टात येईल आणि भाजपा त्यांचा हात सोडू शकेल. राष्ट्रीय नेतृत्वावर दबाव आणून राजे यांनी आपलंच घोडं पुढे दामटलं होतं. परंतु, मतदारांनीच त्यांना नाकारल्यास गजेंद्र सिंह शेखावत किंवा राज्यवर्धन राठोड हे दोन पर्याय भाजपाकडे आहेत. त्यांना प्रदेश नेतृत्वाची संधी दिली जाऊ शकते.  

४. प्रादेशिक पक्षांना धक्का

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये प्रादेशिक पक्ष निष्प्रभ ठरत असल्याचं एक्झिट पोलमधून दिसतंय. याचाच अर्थ, मतदार आता राष्ट्रीय पक्षांना पसंती देताना दिसताहेत. हा बदलता कल देशाच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो. 


५. महाआघाडीचा प्रयोग फसेल?

तेलंगणा विधानसभेत पुन्हा टीआरएस सत्ता स्थापन करेल, असं एक्झिट पोल सांगतात. म्हणजेच, काँग्रेसच्या महाआघाडीला केसीआर भारी पडताना दिसताहेत. याचा परिणाम २०१९ साठी होऊ घातलेल्या महाआघाडीच्या भवितव्यावर होऊ शकतो. तेलंगणामध्ये भाजपा शर्यतीत नव्हतीच. उलट, टीआरएसचा विजय त्यांच्यासाठी आशादायीच ठरू शकेल.


६. संसदेत विरोधक होणार आक्रमक

भाजपा हरणं म्हणजे काँग्रेस आणि सर्वच विरोधकांना ऑक्सिजन मिळण्यासारखं आहे. दोन राज्यांमध्ये जरी सत्तांतर झालं तरी विरोधकांना नवचैतन्य मिळेल आणि हिवाळी अधिवेशनात ते मोदी सरकारला घेरण्याचा नव्या जोमाने प्रयत्न करतील. 

७. राम मंदिरच भाजपाचा आधार?

आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्यात आणि यापुढेही लढवू, असं भाजपा नेते म्हणत असले तरी, या 'मिनी लोकसभा' निवडणुकीत धक्का बसल्यास त्यांना रणनीती बदलावी लागू शकते. अशावेळी अयोध्येतील राम मंदिराचा शंख फुंकला जाऊ शकतो, हिंदुत्वाचा नारा दिला जाऊ शकतो, असं जाणकारांना वाटतंय. 


८. काँग्रेसच्या 'हाता'तून सुटतोय ईशान्य भारत

ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये काँग्रेसचा दबादबा होता. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिथे केलेल्या कामाचा फायदा भाजपाला होत असून मिझोरमही काँग्रेसच्या हातून जाताना दिसतंय. त्यावर त्यांना चिंतन करावं लागेल.

Web Title: how the polical scenario will change if exit polls of 5 assembly elections becomes results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.