कोरापत - ओदिशाच्या कोरापत जिल्ह्यात रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरीचे एक प्रकरण समोर आले असून रुग्णालयाने प्रवेश नाकारल्यामुळे एका गर्भवती महिलेने नाल्यामध्ये अर्भकाला जन्म दिला. आवश्यक कागदपत्रे नसल्याचे कारण देत रुग्णालयाने या महिलेला दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णालयाला लागून असलेल्या नाल्यामध्ये ही महिला प्रसूत झाली.
महिलेकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी या महिलेला तपासण्यास नकार दिला. ही महिला आपल्या आजारी नव-याला भेटण्यासाठी रुग्णालयात आली होती. त्याचवेळी तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. खरतर अशावेळी रुग्णालयाने माणुसकी दाखवून त्या महिलेला दाखल करुन डॉक्टरांनी उपचार करायला पाहिजे होते.
पण रुग्णालयाने आपली मुजोरी दाखवून दिली. आता या महिलेला त्याच रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.