आग्रा, दि. 19- माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची पत्नी सलमा अन्सारी चालवत असलेल्या मदरशात अज्ञात इसमांनी पाण्याच्या टाकीत उंदीर मारण्याचं विष टाकल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अलिगडमध्ये असलेल्या या चाचा नेहरू मदरशात ४ हजार मुलं शिकण्यासाठी येतात. अल नूर चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था हा मदरसा चालवते. सलमा अन्सारी या चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
'हा संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक आहे. ही गोष्ट मला समजल्यावर मी मदरशाच्या वॉर्डनना पोलिसात तक्रार दाखल करायला सांगितली होती. हा संपूर्ण प्रकार पाहता आम्ही आता या मदरशात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे, असं सलमा अन्सारी यांनी म्हंटलं आहे.
'वसतिगृहात राहणार एक मुलगा मोहम्मद अफजल हा शुक्रवारी संध्याकाळी पाणी पिण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याला दोन माणसं पाण्याच्या टाकीत गोळ्या टाकताना दिसली. त्याने त्यांना हटकलं, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याला पिस्तुल दाखवून गप्प राहण्यास सांगितलं.' ती दोन माणसं तिथून निघून गेल्यावर त्या मुलाने हा संपूर्ण प्रकार वॉर्डनला सांगितला. त्या माणसांनी तिथेच टाकलेलं गोळ्यांचं रॅपर दाखवलं. त्यावेळी तात्काळा पाण्याचा पुरवठा तत्काळ थांबवण्यात आला, असं मदरशाच्या वॉर्डन जुनैद सिद्धिकी यांनी सांगितलं आहे.
सुदैवाने मदरशामध्ये घडलेला प्रकार एका विद्यार्थ्याने पाहिला आणि त्याने तात्काळ वॉर्डनला याबद्दल सांगितलं. आम्ही मदरशातील पाण्याचे नमुने घेतले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचं अलीगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश पांडे यांनी सांगितलं आहे. 'उंदीर मारण्याचं औषध विषारी असलं तरी ते विशिष्ट अँटिकॉग्युलंटसोबत मिसळून दिल्याशिवाय माणसं मरू शकत नाहीत. पण आजारी पडू शकतात, असं अलिगडच्या जे. एन. मेडिकल कॉलेजचे डॉ. ऐहतीशाम अहमद म्हणाले आहेत.
देशात मला असुरक्षित वाटतं, असं उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत असताना हमीद अन्सारी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर भाजपाकडून कडाडून टीका झाली होती.