दीडशे फूट भुयार खणून करायचे पेट्रोलची चोरी! स्फोटानंतर प्रकार उघडकीस, पाइपलाइनला पाडले होते भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 01:22 AM2018-01-26T01:22:54+5:302018-01-26T01:24:42+5:30
सूरज विहारमध्ये गेल्या मंगळवारी रात्री ९ वाजता स्फोटाच्या आवाजाने इमारती हादरल्या आणि रहिवासीही घाबरून गेले. स्फोटाची माहिती मिळताच पोलीसही तिथे तातडीने येऊन पोहोचले. तिथे त्यांना दिसला आठ फूट खोल खड्डा. पोलिसांनी त्या जागेची बारकाईने तपासणी केली, तेव्हा आढळलेला प्रकार धक्कादायक होता. तो खड्डा म्हणजे होते एक लांबलचक भुयार. इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनमधून पेट्रोल चोरण्यासाठी हे भुयार शर्वलिकांनी खणले होते.
नवी दिल्ली : येथील सूरज विहारमध्ये गेल्या मंगळवारी रात्री ९ वाजता स्फोटाच्या आवाजाने इमारती हादरल्या आणि रहिवासीही घाबरून गेले. स्फोटाची माहिती मिळताच पोलीसही तिथे तातडीने येऊन पोहोचले. तिथे त्यांना दिसला आठ फूट खोल खड्डा. पोलिसांनी त्या जागेची बारकाईने तपासणी केली, तेव्हा आढळलेला प्रकार धक्कादायक होता. तो खड्डा म्हणजे होते एक लांबलचक भुयार. इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनमधून पेट्रोल चोरण्यासाठी हे भुयार शर्वलिकांनी खणले होते.
या भुयारामध्ये गॅसचा दाब वाढून स्फोट झाला होता. भुयार खणून पेट्रोल चोरण्याची शक्कल लढविणाºया चोरांचा म्होरक्या झुबैर याला पोलिसांनी अटक केली असून त्याचा भंगारविक्रीचा व्यवसाय आहे. त्याचा एक साथीदार मात्र पळून गेला. ही टोळी इंडियन आॅइलच्या पाइपलाइनमधून दर आठवड्याला तीन हजार लिटर पेट्रोल चोरत असे.
या पाइपलाइनपर्यंत पोहोचण्यासाठी या चोरट्यांनी लढविलेली अफलातून शक्कल लढविली होती. त्यांनी जमिनीखाली १५० फूट लांबीचा व अडीच फूट रुंद असे भुयार खणले होते. हे भुयार जिथे संपत होते तिथे छोटीशी खोली बांधण्यात आली होती.
तिथून पेट्रोलच्या पाइपलाइनला एक पाइप जोडून त्याला एक नळ बसविला होता. त्याद्वारे इंडियन आॅइलच्या पाइपलाइनमधून पेट्रोलची चोरी करून ते तीन पिंपांच्या टाक्यांमध्ये साठविले जात असे.
या चोरलेल्या पेट्रोलमध्ये केरोसिनची भेसळ करून ते काळ््या
बाजारामध्ये विकून ही टोळी धन कमवत असत.
भंगाराच्या मागे भुयाराचे तोंड-
झुबैरने या परिसरात भाड्याने घेतलेल्या जागेत भंगारचा व्यवसाय सुरू केला होता. बिजवासन येथून पानिपतपर्यंत जाणारी इंडियन आॅइलची पेट्रोल पाइपलाइन त्याच्याजवळूनच जाते, हे लक्षात येताच त्याने आणखी एक जागाही भाड्याने घेतली. त्यानंतर झुबैर व त्याच्या साथीदारांनी दिवस-रात्र एक करून या जमिनीत भुयार खोदले व भुयाराचे प्रवेशद्वार भंगाराआड दडविले. गेल्या आठवड्यात भुयार खणून पूर्ण होताच, त्यांनी पेट्रोलचोरीला सुरुवात केली होती; पण मंगळवारच्या स्फोटाने त्यांचे सारे पितळ उघडे पडले.