हैदराबाद - वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यामागे ट्रॅफिक पोलिसांची खूप मोठी भूमिका असते. साधारणपणे आपण अनेकदा पाहिलं असेल जास्त ट्रॅफिक असल्यामुळे एखादी रूग्णवाहिका रस्त्यावर अडकली तर रूग्णाला मृत्यूचाही सामना करावा लागू शकतो. पण हैदराबादमधील या एक ट्रॅफिक पोलिसाने जे केले ते पाहून तुम्ही चकीत व्हाल. हैदराबादमध्ये एक रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर या रुग्णावाहिकेला रस्ता देण्यासाठी ट्रॅफिक पोलीस जवळपास 2 किलोमीटर धावला आहे. रुग्णवाहिकेसाठी 2 किमी धावणाऱ्या पोलिसाचं लेकीने देखील कौतुक केलं आहे.
जी बाबजी असं या ट्रॅफिक पोलिसाचं नाव असून त्यांचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हैदराबाद पोलिसांकडूनही त्यांना सन्मानित करण्यात आलं. मात्र यामध्ये त्यांच्या लेकीची शुभेच्छा त्यांच्यासाठीही खूप खास ठरली आहे. बाबजी यांना एक सात वर्षांची मुलगी आहे. चिमुकलीने आपल्या वडिलांचा हा व्हिडीओ पाहिला होता. रात्री अकरा वाजेपर्यंत ती वडिलांची वाट पाहत जागीच राहिली.
मुलीकडून झालेलं कौतुक पाहून पिता झाला भावुक
जी बाबजी कामावरून जेव्हा घरी आले तेव्हा तिने वडिलांच्या हातात एक कागद दिला. आपल्या वहिच्या एका पानावर 'कॉन्ग्रॅज्युलेशन्स डॅडी' असं या चिमुरडीनं लिहिलेलं होतं. आपल्याच मुलीकडून झालेलं हे कौतुक पाहून पिता देखील भावुक झाला आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर जी बाबजी यांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. व्हिडीओमध्ये रुग्णवाहिलेला रस्ता देण्यासाठी बाबजी धावत असलेले पाहायला मिळत आहेत.
सलाम! रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी तब्बल 2 किलोमीटर धावला ट्रॅफिक पोलीस
बाबजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी त्यांनी एक रुग्णवाहिका पाहिली. या रुग्णवाहिकेत रुग्ण गंभीर स्थितीत होता. वाहतूक कोंडी झाल्यामुळे रूग्णाचे कुटुंबीय खूप चिंतेत होते. म्हणून काहीही करून रुग्णवाहिकेला रस्ता देण्याचा विचार या पोलिसानं केला. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाला त्यांनी ट्रॅफिक सोडून त्यांच्या समोर चालण्यासाठी विनंती केली. यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा मिळाला. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.